सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कोरोना रुग्णांसाठी शासकीय यंत्रणा लवकरात लवकर चालू करा !

आमदार सुधीर गाडगीळ यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना आमदार सुधीर गाडगीळ (डावीकडे), तसेच अन्य

सांगली, ६ एप्रिल – सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कोरोना रुग्णांसाठी शासकीय यंत्रणा लवकरात लवकर चालू करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत, या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना ६ एप्रिल या दिवशी दिले. या वेळी युवामोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, सचिव विश्‍वजीत पाटील, गणपति साळुंखे, मकरंद म्हामुलकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार नव्हता; मात्र यंदा मार्चपासूनच कोरोना महामारी वेगाने पसरत आहे. गेल्या वर्षी जुलैनंतर कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागल्यावर प्रशासनाची धावपळ झाली होती. त्या वेळी कोट्यवधी रुपये व्यय करून जिल्हा प्रशासनाने क्रीडा संकुलमध्ये आणि महापालिका प्रशासनाने आदीसागर मंगल कार्यालयात कोरोना केअर सेंटर चालू केले होते. तेथे प्राणवायूची सुविधा केली; पण ‘व्हेंटिलेर्स’ची उपलब्धता नव्हती. शिवाय रुग्णांची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला पुन्हा तेथून खासगी रुग्णालयात नेण्याची वेळ येत होती. या त्रुटी दूर करून या सेंटरमध्येच अत्यावश्यक यंत्रणा उभी करावी.