आशा प्रवर्तकांचे प्रश्‍न न सुटल्यास आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांची आंदोलन करण्याची चेतावणी !

कोल्हापूर, ६ एप्रिल (वार्ता.) – आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या अनेक ठिकाणी प्रतिदिन ८ घंट्यांपेक्षा अधिक काम करतात, तसेच त्या सुट्टीच्या दिवशीही काम करतात. इतके काम करूनही त्यांना त्याचा पुरेसा मोबदला देण्यात येत नाही. महापालिका क्षेत्रात काही ठिकाणी ३०० रुपये भत्ता देण्यात येतो, तर ग्रामीण भागात तो अजिबात देण्यात येत नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेत आशा स्वयंसेविकांना जुंपले असून प्रत्येक व्यक्तीमागे केवळ १० रुपये देण्यात येतात. ते अत्यंत तुटपुंजे आहेत. कुटुंब सर्वेक्षण, पाणी सर्वेक्षण, जंतूनाशक गोळ्या वाटप यांसह अनेक कामे आशा स्वयंसेविकांना करावी लागतात. १७ जुलै २०२० च्या शासकीय आदेशानुसार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात २ सहस्र रुपयांची वाढ करण्यात आली होती. ही वाढ बहुसंख्य महापालिकांनी दिलेली नाही. तरी आशा प्रवर्तकांचे प्रश्‍न न सुटल्यास आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने नेत्रदीपा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.