स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती थांबवण्याविषयी पंतप्रधान मोदी यांना सावरकरप्रेमींनी लिहिलेले पत्र

विषय : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची त्यांच्या विरोधकांकडून केली जाणारी अपकीर्ती (बदनामी) तातडीने थांबवा !

प्रति,

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी,

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव करण्याचा योग आला, त्या त्या वेळी त्यांच्या विरोधकांनी विशेषतः काँग्रेसी, तसेच तथाकथित पुरोगाम्यांनी त्यांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. भाजप शासन केंद्रस्थानी आणि काही राज्यांमधून सत्तेवर आल्यापासून, विशेषतः वर्ष २०१४ मध्ये आपल्या नेतृत्वाखाली शासन आल्यानंतर तर सावरकर विरोधकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपकीर्त (बदनाम) करण्याची एक प्रकारची चढाओढ लागलेली असून अजून ती चालूच आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर

१. सावरकर यांच्या क्षमायाचनेचे आवेदन दस्तऐवज परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत !

ज्यावरून सावरकर यांना ‘माफीवीर’ असे त्यांच्या विरोधकांनी संबोधले, त्या ‘सावरकर यांच्या क्षमायाचना आवेदनांविषयी अंदमान येथे कागदोपत्री कोणता पुरावा आहे आणि असा पुरावा अंदमानच्या वस्तूसंग्रहालयात का ठेवण्यात आलेला नाही ?’, या एका प्रश्‍नाला ४ फेब्रुवारी २०२० या दिवशी लोकसभेत दिल्या गेलेल्या उत्तराने माझे तरी समाधान झालेले नाही. विविध नैसर्गिक (भूकंप, वादळे-सुनामी) आपत्तींमुळे आणि इंग्रजांनी अंदमान येथील वसाहत अन्यत्र हालवतांना जी विविध कागदपत्रे-दस्तऐवज, अभिलेख-वह्या अन्यत्र हालवले गेले, ते इंग्रजांच्या त्या वेळेच्या मुंबई, देहली, कोलकाता, चेन्नई (मद्रास) आणि लंडन येथील प्रमुख कार्यालयांत ठेवले गेल्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या अनुषंगाने आपल्या शासनाकडून ते मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न केला जावा, असे मला वाटते.

२. केंद्रशासनाने ‘अधिकृत सावरकर चरित्र’ प्रसिद्ध करावे !

ज्या ज्या न्यायालयांत सावरकर यांना उभे केले गेले, त्यांच्याविरुद्ध अभियोग चालवले गेले, त्या त्या न्यायालयांतील नोंदी-अभिलेख, तसेच ज्या ज्या महसूल विभागांमध्ये सावरकर यांचे वास्तव्य होते, जेथे जेथे त्यांचे दौरे झाले, त्या त्या विभागांत असलेल्या महसूल कार्यालयांतील पोलीस ठाणे-चौक्या आणि त्या त्या विभागांतील सावरकरांविषयीचे गुप्तहेर खात्याचे अहवाल-नोंदी-अभिलेख किंवा अधिकार्‍यांचे अभिप्राय एकत्र केले जावेत. सावरकर यांचे एकूण साहित्य (लेख, कविता, व्याख्याने आदी) संकलित करून ते ‘स्वातंत्र्यवीर’ कसे होते ? हे स्पष्ट करणारा, सिद्ध करणारा एखादा ग्रंथ केंद्रशासनाने ‘अधिकृत सावरकर चरित्र’ अशा दृष्टीने प्रकाशित करावा. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वेळोवेळी केलेली भाकिते आणि दिलेल्या चेतावण्या यांमधून त्यांचे प्रतीत होणारे द्रष्टेपण त्यामध्ये अधोरेखित करावे.

३. सावरकर चरित्रामध्ये अंतर्भूत करावयाच्या गोष्टी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मापूर्वीची सावरकर कुटुंबाची सांपत्तिक स्थिती सावरकर चरित्रामध्ये मुद्दाम अंतर्भूत करावी. त्यांच्या जन्मापूर्वीच्या १०० ते २०० वर्षांतील व्यक्तींचा, तसेच घटनांचा, त्या व्यक्तींनी मांडलेल्या विचारांचा सावरकर यांच्या जीवनावर झालेला परिणाम, त्यांच्या समकालीन व्यक्तींच्या चरित्रात आलेला सावरकर संबंध, त्या समकालीन व्यक्तींनी मांडलेल्या विचारांचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांशी झालेला संघर्ष किंवा त्यांच्या विचारांतील साम्य आदी सर्व त्या ‘सावरकर चरित्रा’त यावे (उदा. सावरकरांना ‘द्विराष्ट्र सिद्धांत मांडणारे’ असे ठरवतांना त्या विषयासंबंधी त्यांच्यापूर्वी राजनारायण बोस, नवगोपाल मित्र, भाई परमानंद, लाला लजपतराय, सर सय्यद अहमद आणि डॉ. भीमराव आंबेडकर या व्यक्तींनी त्याच विषयावर मांडलेल्या विचारांचाही तौलनिक अभ्यास येथे यावा.)

सावरकरांच्या इतकेच शिक्षित असलेल्या (उदा. बॅरिस्टर) इतर राजकीय नेत्यांना ब्रिटिशांकडून दिली गेलेली एकूण वागणूक, देण्यात आलेल्या शिक्षा, सोयी-सवलती, आर्थिक साहाय्य यांविषयीची माहिती ‘सावरकर चरित्रा’त दिली जावी. काँग्रेस आणि तथाकथित पुरोगाम्यांच्या आजच्या ज्या नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली जाते, त्यांच्याच पक्षाच्या पूर्वीच्या इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया यांसारख्या काही नेत्यांनी सावरकरांप्रती काढलेल्या गौरवोद्गारांचाही ‘सावरकर चरित्रा’त समावेश केला जावा.

४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवले जावे !

आज अनेक भारतियांकडून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवले जावे’, अशी मागणी होत आहे. येथे मला सुप्रसिद्ध संसदपटू आणि समाजवादी नेते बँरिस्टर नाथ पै यांनी सावरकर यांना श्रद्धांजली वहातांना काढलेल्या पुढील उद्गारांची आठवण होते. ते म्हणाले होते, ‘‘भारतरत्न हाच हिंदुस्थानचा सर्वोच्च बहुमान धरला जात असेल, तर तो सावरकर यांना दिला जाण्याने त्या पुरस्काराचाच बहुमान होणार आहे.’’ काही हिंदुत्वनिष्ठ सावरकरप्रेमींना (आणि काही सावरकर विरोधकही खोचकपणे याविषयी प्रश्‍न विचारतात) असे वाटते की, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील ५ वर्षांच्या आणि वर्ष २०१४ पासूनच्या अनुमाने साडेसहा वर्षांच्या कालावधीतील आपल्या नेतृत्वाखालच्या भाजप शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान देऊन गौरवले का नाही ? तसे देता येत नसेल, तर का देता येत नाही, हे का स्पष्ट केले नाही ?

५. ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी अधिकृत करावी !

कोणतेही घटनात्मक बंधन येऊ शकत नसेल, तर विनायक दामोदर सावरकर यांना लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेली ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी केंद्रशासनाने अधिकृत करावी आणि ‘तोच त्यांचा सर्वोच्च सन्मान आहे’, असे घोषित करावे. त्यासह वरील एका परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र’ हा अधिकृत असा ग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी आणि शक्य होईल तितक्या प्रादेशिक भाषांमधून प्रकाशित करावा. त्या व्यतिरिक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपकीर्त करणार्‍या व्यक्तींना सध्याच्या भारतीय दंड संहितेत देशद्रोहाला दिल्या जाणार्‍या शिक्षेची जितकी तरतूद आहे, तितकी कडक शिक्षा दिली जावी.

कृपया माझ्या निवेदनाचा सकारात्मक विचार करावा, ही विनंती.

आपला कृपाभिलाषी,

श्री. श्रीकांत वि. ताम्हणकर, पुणे