ब्रिटनमध्ये ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’ची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांचा मृत्यू

लंडन (ब्रिटन) – कोरोनावर ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’च्या लसीचे डोस ब्रिटनमध्ये दिले जात आहेत. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांना प्राण गमवावे लागले असल्याची माहिती ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी या वैद्यकीय प्राधिकरणाने दिली आहे. युरोपीयन युनियनमधील काही देशांनी याच कारणांमुळे एस्ट्राजेनका लसीचा वापर थांबवला आहे.

एजन्सीने सांगितले की, २४ मार्चपर्यंत लस घेतल्यानंतर रक्ताची गाठ झाल्याची ३० प्रकरणे समोर आली. त्यांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये १ कोटी ८१ लाख डोस देण्यात आले आहेत. त्यांपैकी ३० प्रकरणे समोर आली आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार लसीचे लाभ अधिक असून हानी अल्प आहे. त्यामुळे लसीचा वापर चालूच ठेवला पाहिजे. लस आणि रक्ताच्या गाठी निर्माण होण्याचा काही संबंध आहे का ?, याचाही शोध घेतला जात आहे.