पाकच्या ‘इकॉनॉमिक को-ऑर्डिनेशन कमिटी’ने भारतातून साखर आणि कापूस यांची परत एकदा आयात करण्याचा घेतलेला निर्णय तडकाफडकी मागे घेतला आहे. ५ ऑगस्ट २०१९ मध्ये भारताने काश्मीरमधील कलम ३७० रहित केल्यानंतर चिडलेल्या पाकने ‘भारतातून वरील वस्तू आयात करायच्या नाहीत’, असा निर्णय घेतला होता. अर्थात् ‘पाकने भारताशी व्यापार करावा किंवा नाही’ या सूत्राचा भारतावर तितकासा परिणाम होणार नाही; परंतु पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मात्र चीन, पाकचे सैन्य यांसह कुणाकुणाचा दबाव आहे आणि ‘निर्णय घेणे’ हे त्यांच्या हातात नाही, हेच यातून सिद्ध होत आहे. यामुळे परत एकदा त्यांची मान खाली गेली आहे. खान यांनी भारताशी व्यापार पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यापर्यंत खाली येणे, हा पाकच्या एकंदर नरमाईच्या भूमिकेचाच एक भाग होता, असे म्हणावे लागेल आणि हे त्यांना का करावे लागले याची कारणेही तशीच आहेत.
पाकचा कुटील हेतू !
काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानने पाकमध्ये घुसून पाक आतंकवाद्यांना मारले. अफगाणिस्तानने पाकवर अशा प्रकारे दबाव आणला. आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात विविध राष्ट्रांना नामांकन देणारी संस्था ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ने (‘एफ.ए.टी.एफ्.’ने) पाकला पूर्वीप्रमाणेच आताही तिसर्यांदा ‘ग्रे लिस्ट’ (राखाडी सूचीत) टाकले आहे आणि अधिक काळ तो या सूचीत राहिला, तर पुढे तो ‘डार्क ग्रे लिस्ट’मध्ये (गडद राखाडी सूचीत) जाण्याची दाट शक्यता आहे. जूनपर्यंत त्याच्याकडे सुधारण्यासाठी मुदत आहे. याचा एक मोठा दबाव पाकवर आहे. त्यामुळे तो स्वतःला सुधारत असल्याचे भासवत आहे. भारतातील आतंकवादास उत्तरदायी असणारे मौलाना मसूद अझर आणि हाफिज सईद यांच्यावरील तोंडदेखली का होईना कारवाई याच कारणामुळे नाईलाजास्तव पाकने यापूर्वी केली आहे.
कर्ज चुकवण्यासाठीही कर्ज घेत असलेल्या पाकिस्तानला अधिक दिवस ग्रे लिस्टमध्ये रहाणे परवडणार नाही; कारण यापुढे तो पूर्ण काळ्या सूचीत (ब्लॅक लिस्ट) गेला, तर वर्ल्ड बँक आणि त्यासारख्या संस्थांकडून त्याला कर्ज मिळणार नाही, हे त्याला ठाऊक आहे. ही कोंडी टाळण्यासाठी कंगाल पाक आता नाईलाजाने आतंकवादाला थांबवण्याचे नाटक का होईना करत आहे. संयुक्त अरब अमिरातचे भारत आणि पाक दोघांसमवेत चांगले संबंध आहेत. संयुक्त अरब अमिरातने पाकवर आतंकवादाला प्रोत्साहन न देण्याच्या संदर्भात दबाव टाकला आहे, अशी चर्चा आहे. असे असेल, तर भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचे हे यश आहे. वरील अनेक कारणांमुळे इम्रान खान यांनी त्यांच्या सैन्याला सांगितले आहे की, शेजारील देशांशी व्यापार संबंध वाढवल्याखेरीज तो सैन्यासाठी निधी देऊ शकत नाही.
भारत-पाक यांच्यामध्ये २३ फेब्रुवारीला पुन्हा एकदा नव्याने नियंत्रणरेषेवर युद्धबंदी करण्याचा करार झाला. २ वर्षे बंद पडलेली बोलाचाली यानिमित्ताने परत चालू झाली. ‘ही शस्त्रसंधी झाली, तरी भारताची आतंकवादविरोधी मोहीम चालू राहील, हे भारताने स्पष्ट केले आहे’, ही जमेची गोष्ट आहे; कारण आतापर्यंत शस्त्रसंधीच्या नावाखाली भारत शस्त्र म्यान करायचा, सैन्य मागे घ्यायचा आणि पाक मात्र गोळीबार चालूच ठेवायचा किंवा आतंकवादी घुसवत रहायचा. असेच इतकी वर्षे चालू होते. या वेळी ५ वर्षांनंतर प्रथमच शस्त्रसंधी करारानंतर मासभरात पाककडून सीमेवर गोळीबार झालेला नाही. अर्थात् पाक सैन्याने घेतलेले हे नरमाईचे धोरण काही सहज म्हणून घेतलेले नसणारच आहे; त्यामागे थकल्याभागल्या आणि कंगाल झालेल्या पाकच्या ‘चीनपुरस्कृत चाली’ काय असतील, याची आपण कल्पना करू शकत नाही. त्यामुळे पाकच्या या वर्तवणुकीविषयी कोणत्याही प्रकारचे भाष्य करणे उतावळेपणा ठरेल.
पडूनही नाक वर !
बालाकोट येथील आतंकवादी अड्डे भारताने उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला नुकतीच २ वर्षे पूर्ण झाल्यावर पाकने ‘आम्ही चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यास सिद्ध आहोत’, असे म्हणून भारतीय वैमानिकाला सोडून दिल्याच्या गोष्टीचा उल्लेख आवर्जून केला. प्रत्यक्षात विंग कमांडर अभिनंदन यांची मुक्तता हा भारताच्या कुशल रणनीतीचा परिणाम होता. पाकला भारत युद्धसज्जता करत आहे, असे वाटले आणि त्या दबावामुळे त्याने त्यांना मुक्त केले होते. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला उत्तर देतांना इम्रान खान यांनी लिहिले की, ‘दक्षिण आशियातील शांतता ही भारत-पाकच्या काश्मीरसहित अन्य सूत्रांवर अवलंबून आहे.’ यासारखा दुसरा कांगावखोरपणा काय असेल ? स्वतः आतंकवाद पोसणारा आणि त्याद्वारे गेली ४० वर्षे छुपे युद्ध करत जेरीस आणू पहाणारा पाक भारताला सतत काश्मीर सूत्रावरून ऐकवतो आहे. स्वतः गलितगात्र असतांना नाक वर करून तो भारताला सुनावत आहे. हा पाकचा उद्दामपणाच आहे. कधीही चर्चा म्हटली की, पाक वारंवार काश्मीरचे सूत्र उपस्थित करतो आणि भारत आतंकवाद रोखण्याचे सूत्र उपस्थित करतो. भारत-पाक कोणत्याही संपर्कात तीच तीच वाक्ये उच्चारत रहातात. आताही इम्रान खान यांच्या पत्रातून तेच दिसत आहे आणि भारताकडून तेच सांगितले जात आहे. त्यामुळे हे ऐकण्याचा आता देशप्रेमी जनतेला कंटाळा आला आहे. पाकने आतापर्यंत भारताची एवढी प्रचंड आणि कधीही भरून न निघणारी हानी केली आहे की, त्याला केवळ आणि केवळ एक घाव दोन तुकडे हीच शिक्षा देणे योग्य आहे. त्यामुळे पाकने सध्या घेतलेली नरमाई हा आरंभ आहे.
३० मार्च या दिवशी भारताचे सैन्यप्रमुख नरवणे यांनी पाकला आतंकवादी तळ उद्ध्वस्त करण्याविषयीही सूतोवाच केले आहे. पाक त्याला कसा प्रतिसाद देतो, ते पहावे लागणार आहे. आता जरी पाकने शस्त्रसंधी पाळली, तरी पाकवर कुणीच विश्वास ठेवू शकत नाही. अडचणीत सापडलेल्या पाकने युद्धविराम चालू ठेवला तर ठीक आहे. त्यानंतर काश्मीर, सियाचीन, बलुचिस्तान, सिंधुजल यांसारख्या अन्य अनेक सूत्रांवर भारताने पाकवर दबाव आणणे आवश्यक आहे. आता पाकने त्याच्यावर दबाव आल्यामुळे भारताशी व्यापार संबंध ठेवणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे पाकच्या राजकारणावर कट्टरतावाद्यांचा प्रभाव आहे, हे स्पष्ट होते. हे लक्षात घेता, पाकशी कोणताही व्यवहार करतांना भारताने विचारपूर्वक कृती करणे अपेक्षित आहे. त्याचा निःपात केल्यानेच भारतात शांती नांदणार, हेच अंतिम सत्य आहे.