पुणे-सातारा मार्गावरील टोल वसुली थांबवा !

सजग नागरिक मंचाची नितीन गडकरींकडे मागणी

पुणे, १ एप्रिल – देहूरोड-सातारा राष्ट्रीय महामार्ग पूर्वी ४ पदरी होता, त्याच्या सहापदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर २०१० या दिवशी चालू झाले. हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते; मात्र अजूनही हे काम चालूच आहे.

नितीन गडकरी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदाराला अनेक नोटिसा दिल्या आहेत ; पण त्यापुढील कारवाई मात्र केली नाही. केवळ सातत्याने मुदतवाढ देण्याचे काम चालू आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण न करणार्‍या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच हे काम गेल्या १० वर्षांपासून रखडले असल्यामुळे १ एप्रिलपासून या रस्त्यावरील टोल वसुली स्थगित करावी, असे मंचाच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे.

या अपूर्ण कामामुळे गेल्या ११ वर्षांत रस्त्यावर कित्येक अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. रस्त्याच्या अवस्थेकडे लक्ष ठेवणे हे प्राधिकरणाचे काम आहे. रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत. महामार्ग प्राधिकरण प्रतिवर्षी कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे. अनेक ठिकाणी सेवा रस्ताच अस्तित्वात नाही. याकडेही वेलणकर यांनी लक्ष वेधले.