अबू धाबी येथील भव्य स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम एप्रिलमध्ये होणार पूर्ण !

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) – येथे बांधण्यात येत असलेल्या हिंदूंच्या स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम पुढच्या मासात म्हणजे एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे. गुजरात आणि राजस्थान येथील २ सहस्रांपेक्षा अधिक शिल्पकारांनी घडवलेल्या दगडाच्या भिंती, त्यावरील सुंदर नक्षीकाम येथे मंदिराच्या उभारणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे पारंपरिक हिंदु पद्धतीचे असणार आहे.

मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ते जागतिक पर्यटनासाठी उघडले जाणार आहे. (हिंदूंची मंदिरे सुंदर आणि नक्षीकाम केलेली असली, तरी ती पर्यटनाची केंद्र होणार नाहीत, याचे भान हिंदूंनी आणि मंदिर व्यवस्थापनांनी ठेवायला हवे. मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. त्याकडे त्या दृष्टीनेच पहायला हवे आणि जगालाही त्या दृष्टीनेच पहायला शिकवायला हवे. या मंदिरांमधून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यासह अन्य धर्मियांना हिंदु धर्माचा अभ्यास करण्याचीही व्यवस्था असावी ! – संपादक)

मंदिरात सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी संकुल असणार आहे. याला भेट देणार्‍यांसाठी केंद्र, प्रार्थना स्थळ, प्रदर्शन, शिक्षणक्षेत्र, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, बगीचा, पुस्तके आणि गिफ्ट शॉप असणार आहेत. वाहनतळासाठीच्या जागेत १२ सहस्र गाड्या सहज उभ्या करता येऊ शकतील. मंदिर परिसरात २ हेलीपॅड बनवण्यात आले आहेत.