सातारा, २६ मार्च (वार्ता.) – राष्ट्रीय कीर्तनकार समर्थभक्त ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांना वर्ष २०२० चा ‘सातारा भूषण’ पुरस्कार श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्रीसमर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थभक्त योगेशबुवा रामदासी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. रामनामी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कराचे स्वरूप होते. समर्थ सदन सांस्कृतिक केंद्रामध्ये ‘रा.ना. गोडबोले सार्वजनिक विश्वस्त न्यासा’च्या वतीने आयोजित मोजक्या समर्थभक्तांच्या उपस्थितीमध्ये कोरोनाविषयक शासकीय नियम पाळत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी न्यासाचे विश्वस्त तथा ज्येेष्ठ करसल्लागार अरुणकाका गोडबोले, माजी नगराध्यक्ष अच्युत गोडबोले, विश्वस्त उदयन गोडबोले, प्रद्युम्न गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.
‘सातारा भूषण’ पुरस्कार हा आफळेबुवा यांच्या कार्य-कर्तृत्वाचा गौरव ! – समर्थभक्त योगेशबुवा रामदासी
या वेळी समर्थभक्त योगेशबुवा रामदासी म्हणाले, ‘‘या सोहळ्यासाठी उपस्थित मंडळी त्यांच्या मोठेपणामुळे पुष्कळ मोठी आहेत. आफळेबुवांच्या सत्कार करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. हे उत्तुंग कर्तृत्व प्राप्त करण्यासाठी जन्मोजन्मीची अखंड तपश्चर्या आणि साधना आहे. हा पुरस्कार म्हणजे आफळेबुवा यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा गौरव आहे.
‘सातारा भूषण’ पुरस्काररूपी शाबासकी म्हणजे श्रीसमर्थ सेवेची आणखी एक धुरा ! – ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवापुरस्काराला उत्तर देतांना ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा म्हणाले, ‘‘श्रीसमर्थ समाधीपुढे कीर्तन करण्याची परंपरा आपल्या कुटुंबियांना प्राप्त झाली. उच्चविद्याविभूषित असतांना, नोकरीची चांगली संधी असतांनाही कीर्तन परंपरेला प्राधान्य देत ही परंपरा पिढ्यान्पिढ्या अखंडपणे पुढे चालूच आहे. यासाठी आमचे वडील ह.भ.प. गोविंदस्वामी आफळे यांनी घालून दिलेला दंडक आमची पिढी अभिमानाने पुढे नेत आहे. ‘सातारा भूषण’ पुरस्काराच्या रूपाने मिळालेली शाबासकी म्हणजे श्रीसमर्थ सेवेची आणखी एक धुरा असल्याचे मी समजतो.’’ |