चिपळूण, २० मार्च (वार्ता.) – खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या आस्थापनात २० मार्चला सकाळी ८.३० वाजता एकापाठोपाठ एक असे २ स्फोट होऊन लागलेल्या आगीत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तसेच १ जण घायाळ झाला आहे.
घरडा केमिकल्स या आस्थापनाच्या प्लान्ट क्रमांक ७ बीमध्ये ‘रिअॅक्टर’मधील तापमान अचानक वाढल्याने त्याचे स्फोट झाले, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या स्फोटात उसळलेल्या वाफसदृश आगीत प्लान्टमध्ये काम करणारे ३ कामगार जागीच ठार झाले, तर १ कामगार गंभीर घायाळ झाला. या दुर्घटनेनंतर आस्थापनाच्या व्यवस्थापनाने घायाळ कामगारांना तात्काळ रुग्णालयात हालवण्याचे प्रयत्न केले; मात्र गंभीर घायाळ असलेल्या आणखी १ कामगाराचा वाटेतच मृत्यू झाला. घरडामध्ये अडकलेल्या अनुमाने ४० ते ४५ कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, आमदार भास्कर जाधव आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे घटनास्थळी दाखल झाले होते.
शिवसेनेचे स्थानिक आमदार योगेश कदम यांनी याविषयी सांगितले, ‘‘ गेल्या वर्षभरातील लोटे एम्.आय.डी.सी.मधील ही सहावी घटना असून तिथे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. भविष्यात यासंबंधी बैठक होण्यासाठी आपण प्रयत्न करू.’’ घरडा आस्थापनाकडून आर्थिक साहाय्य या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५५ लाख रुपये, तर घायाळ कामगाराचा रुग्णालयातील सर्व व्यय आणि २० लाख रुपये घरडा आस्थापनाकडून देण्यात येणार आहेत.