दळणवळण बंदीच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात साधकांच्या मुलांसाठी ‘शौर्यजागृती’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्याने झाली. व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी शौर्य जागृत करण्याची आवश्यकता कथन केली, तसेच ‘स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम होणे आवश्यक असून त्यासाठी प्रत्येकाने स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची आणि प्रशिक्षणाच्या शक्तीला भक्तीची जोड देणे महत्त्वाचे आहे’, असे सांगितले. या व्याख्यानांच्या नंतर अनेक ठिकाणी ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या या ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गांत युवावर्ग उत्साहाने सहभागी झाला. त्यांना प्रशिक्षणामुळे, तसेच प्रशिक्षणाला साधनेची जोड दिल्यामुळे अनेक लाभ झाले. युवावर्गाने व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.
१. कु. वैष्णवी चेचरे, भाटे
१ अ. प्रशिक्षणवर्गातून साधनेचे गांभीर्य लक्षात येणे : ‘या अगोदर मी आई-बाबांच्या समवेत सनातन संस्थेच्या कार्यक्रमांना जात होते. तेव्हा मला साधनेचे विशेष गांभीर्य नव्हते; पण साधकांंनी मला प्रशिक्षणवर्गात सहभागी करून घेतले. या वर्गामध्ये शौर्याचे प्रसंग आणि हिंदूंवर होणार्या आघातांचे प्रसंग सांगितले जायचे. त्यामुळे मला त्याचे महत्त्व समजले. नंतर आम्हाला साधनेचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. त्यानंतर मी साधना करू लागले.
१ आ. साधना चालू केल्यावर आत्मविश्वास वाढून मनमोकळेपणे बोलता येऊ लागणे : मी प्रतिदिन एक ते दीड घंटा नामजप करायला आरंभ केला. त्यानंतर मी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेलाही आरंभ केला आणि मला आनंद मिळू लागला. आता माझा आत्मविश्वास वाढला आहे आणि मी मनमोकळेपणाने बोलू लागले आहे. आता ‘अन्य काही करायला नको; कारण त्यामुळे ‘माझ्या व्यष्टी आणि समष्टी साधनेत खंड पडेल’, असे मला वाटते. साधकांच्या माध्यमातून गुरुदेवांनी मला या कार्यात सहभागी करून घेतले. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. कु. वैदेही खडसे, जाकादेवी
२ अ. साधनेमुळे स्वतःचे स्वभावदोष न्यून होणे, त्यामुळे इतरांसाठी प्रतिकूल असलेला दळणवळण बंदीचा कालावधी स्वतःसाठी कृतज्ञताकाळ ठरणे
२ अ १. ‘देवाची आराधना कशी करायची ?’, ते कळणे : ‘मी खरेतर प्रशिक्षणवर्गातून साधनेत आले. मला प्रशिक्षणवर्गातून विचार करण्यासाठी चालना मिळाली. यातून मला बोलण्याचे धाडस मिळाले आणि स्वतःचे विचार मांडता आले. त्यानंतर ‘देवाला कसे आळवायचे ? त्याला प्रार्थना कशी करायची ? प्रत्येक गोष्टीला भाव कसा जोडायचा ?’, ही साधनेची सूत्रेही समजली.
२ आ २. साधनेमुळे स्वतःचे स्वभावदोष न्यून होऊन स्वतःत आमूलाग्र पालट झाल्याचे जाणवणे : साधना करतांना कळत नकळतपणे भगवंताच्या कृपेने माझ्यात आमूलाग्र पालट होत गेले. हे पालट होत असतांना मला गुरुदेवांची अपार कृपा अनुभवता आली. आधी आई-बाबांनी मनाविरुद्ध काही सांगितले की, मला तीव्र राग येऊन मी रडायचे. तेव्हा मी कुणाशी काही बोलायचे नाही, तर कधी जेवायचे नाही. कधीकधी ३ – ४ दिवस अशीच स्थिती रहायची; पण या सत्संगातून मला ‘स्वभावदोष कसे शोधायचे ? त्यावर स्वयंसूचना कशी सिद्ध करायची ?’, हे कळले. त्यातून स्वभावदोष न्यून करण्यासाठी माझे प्रयत्न वाढले.
२ आ ३. व्यष्टी आढाव्याचे जाणवलेले महत्त्व ! : यामध्ये सर्वांत महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे व्यष्टी साधनेचा आढावा ! त्यातून ‘इतरांचे प्रयत्न कसे असतात ?’, ते मला शिकायला मिळाले आणि नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, उपाय, कृतीला भावाची जोड देणे, तसेच स्वभावदोषांचे लिखाण यांमध्ये वाढ झाली. नंतर हळूहळू ‘मी गुरुदेवांच्या कृपेने साधनारत कशी झाले ?’, हे मलाही कळले नाही. दळणवळण बंदीच्या आधीची वैदेही आणि आताची वैदेही यांच्यात मोठा भेद आहे. कुठे छोट्या गोष्टींवरही चिडणारी, रडणारी, हवे ते मिळाले नाही, तर भांडणारी वैदेही आणि आता मात्र सर्व ऐकून घेणारी, सगळ्यांना समजून घेऊन वागणारी वैदेही !
असा पालट केवळ आणि केवळ गुरुमाऊलीच्या कृपेने झाला आहे. कोरोनाचे हे संकट समाजाच्या दृष्टीने आपत्काळ असूनही गुरुदेवांच्या अपार कृपेने मला मात्र ते संपत्काळासारखे वाटले, म्हणजेच प्रतिकूल काळातही अनुकूलता अनुभवता आली. त्यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
३. कु. मेघा जड्यार, सावर्डे
३ अ. प्रशिक्षणाच्या माध्यमातून सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर साधना होऊ लागणे आणि वर्गात निर्भयपणे बोलण्याचे बळ मिळणे : ‘दळणवळण बंदीच्या काळात मी सावर्डे येथे आल्यावर प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्यामुळे माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न पुष्कळ वाढले. मला सेवा करण्याची संधीही मिळाली. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे माझ्या स्वभावात नम्रता आली. वर्गामध्ये ‘व्यायाम प्रकार घेणे, शौर्याचे प्रसंग आणि आघातांचे प्रसंग कसे मांडावेत ?’, हे फार चांगल्या प्रकारे शिकायला मिळाले. मला निर्भयपणे बोलण्याचे बळ मिळाले.
३ आ. प्रशिक्षणवर्गामुळे घराचे दायित्व आणि साधना या दोन्ही गोष्टी व्यवस्थित करता येणे : घरी आई रुग्णाईत असतांनाही ईश्वराने माझ्याकडून साधना आणि घरचे दायित्व दोन्ही व्यवस्थित सांभाळून घेतले. माणसाचा जन्म ईश्वरप्राप्तीसाठीच झाला असून ‘साधना करूनच ईश्वरप्राप्ती होणार आहे’, याची ईश्वराने मला जाणीव करून दिली. आधी बुद्धीच्या स्तरावर विचार केला जायचा. आता ईश्वराला विचारून आणि भाव ठेवून सर्व गोष्टी केल्या जातात. ‘मला मायेतून बाहेर पडून पूर्णपणे सेवेत येण्याची बुद्धी ईश्वर देवो आणि माझ्याकडून अशीच साधना करून घेवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’
४. सौ. ज्योती मुळ्ये
४ अ. प्रशिक्षणवर्गाच्या वेळी झालेला त्रास – वर्गातील विषय ऐकल्यानंतर डोके जड होऊन मनावर दाब जाणवणे, नामजपादी उपायांनंतर त्रास न्यून होणे, असे दोन वेळा होऊनही ‘वर्गाला जाणे सोडायचे नाही’, असे ठरवणे : ‘२.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती वर्ग होता. त्या वर्गात प्रात्यक्षिके दाखवून झाल्यावर साधक ‘महिलांवरील अत्याचार, लव्ह जिहाद आणि बलात्कार’ यांविषयी सांगत होते. ते ऐकतांना मला त्रास झाला नाही; पण नंतर मी अस्वस्थ झाले. माझे डोके जड झाले. मला माझ्या मनावर दाब आल्यासारखे वाटून मनात नकारात्मक विचार चालू झाले. नामजपादी उपाय केल्यावर मला बरे वाटले.
मंगळवारी ६.१०.२०२० या दिवशीच्या वर्गाच्या वेळी मला पुन्हा तसेच झाले. मी मला झालेले हे त्रास वर्ग घेणार्या उत्तरदायी प्रशिक्षकांना सांगितले. ‘मला असे त्रास झाले, तरीही प्रशिक्षण सोडायचे नाही’, असे मी ठरवले.
४ आ. प्रशिक्षणवर्गात आलेली अनुभूती : १३.१०.२०२० या दिवशी झालेल्या प्रशिक्षणवर्गाच्या वेळी वर्ग चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत मला चैतन्य जाणवले. आज्ञाचक्रावर पूर्णवेळ गारवा जाणवत होता. मला ही अनुभूती गुरुदेवांच्या कृपेनेच अनुभवता आली. यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
५. कु. महेश लाड, सावर्डे
अ. ‘परिस्थितीला अनुसरून स्वतःमध्ये कोणत्या कौशल्यांचा विकास करायला पाहिजे ?’ आणि ‘आपत्तीजनक परिस्थितीमध्ये कसे निर्णय घ्यावे ?’, हे मला शिकायला मिळाले.
आ. ‘ईश्वराचा प्रिय भक्त होण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ? आणि गुर्वाज्ञेचे पालन करण्याचे टाळल्यास होणारे दुष्परिणाम कोणते ?’, ते मला समजले.
६. कु. सायली घाडे, चिपळूण यांना शिबिरात आलेल्या अनुभूती
अ. ‘१७.५.२०२० या दिवशी झालेल्या शिबिरात ‘प.पू. गुरुमाऊली, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उपस्थित आहेत’, असे मला दिवसभर अनुभवता आले. ‘मी रामनाथी आश्रमातच आहे’, असे मला जाणवत होते.
आ. २४.५.२०२० या दिवशी झालेल्या शिबिरामध्ये ‘श्रीकृष्ण व्यासपिठावरील सिंहासनावर बसून आमची चर्चा ऐकून स्मितहास्य करत आहे’, असे मला दिसत होते.’
|