नेपाळमधील सरकारी कार्यालयातील बॉम्बस्फोटात ८ जण घायाळ

भ्रष्टाचाराच्या विरोधात स्फोट घडवून आणल्याचे सांगत स्थानिक संघटनेने घेतले स्फोटाचे दायित्व !

नेपाळमधील सरकारी कार्यालयातील बॉम्बस्फोट

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या लाहान जिल्ह्यातील सिराहा येथे १४ मार्च या दिवशी भूमी महसूल विभागाच्या कार्यालयात झालेल्या प्रेशर कुकर बॉम्बच्या स्फोटात ८ जण घायाळ झाले. या आक्रमणाचे दायित्व जय कृष्ण गोईत याच्या नेतृत्वाखालील जनतांत्रिक तराई मुक्ती मोर्चा (क्रांतिकारी) या संघटनेने घेतले आहे. ‘हा भ्रष्टाचाराच्या विरोधातील संघटनेच्या अभियानातील एक भाग आहे’, असे या संघटनेने म्हटले आहे. ‘जर भ्रष्टाचार चालू राहिला, तर आणखी कठोर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी नेपाळ, तसेच प्रांतीय सरकार यासाठी उत्तरदायी असेल’, अशी चेतावणीही या संघटनेने दिली आहे. जनतांत्रिक तराई मुक्ती मोर्चा ही संघटना भारताच्या सीमेलगतच्या मैदानी प्रदेशातील तराई भागातील लोकांना राजकीय आणि आर्थिक अधिकार देण्याची मागणी करत आहे.