दोषींवर कलम ३०२ अंतर्गत कारवाई करा ! – आरोग्य साहाय्य समितीची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे ३ वर्षांच्या मुलीचे डॉक्टरांच्या माणूसकीशून्य वर्तनामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण

अशी मागणी का करावी लागते ? संवेदनशून्य आणि माणूसकीशून्य रुग्णालये आणि डॉक्टर यांच्यावर कारवाई का होत नाही ?

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना आरोग्य साहाय्य समितीचे कार्यकर्ते

वाराणसी (उत्तरप्रदेश) –  प्रयागराज येथील करेलीमध्ये रहाणारे मुकेश मिश्रा यांची ३ वर्षांची मुलगी खुशी हिचा ७ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. येथील ‘युनायटेड मेडिसिटी’ रुग्णालयाने या मुलीवर शस्त्रकर्म झाल्यावर तिच्या पालकांनी त्याचे शुल्क न भरल्याने मुलीच्या पोटाला टाके न घालता तसेच रुग्णालयातून बाहेर काढल्याने तिचा मृत्यू झाला होता.

ही एकप्रकारे हत्याच आहे. सध्याची वैद्यकीय सेवा एक कॉर्पोरेट व्यवसाय बनल्याचा हा दुष्परिणाम आहे. या दृष्टीने दोषी डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारे निवेदन आरोग्य साहाय्य समितीकडून वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आले.

या वेळी अधिवक्ता अरुणकुमार मौर्य, अधिवक्ता स्वतंत्र तिवारी, ‘जागरूक एक्सप्रेस’ नियतकालिकाचे पत्रकार श्री. आय.बी. जयस्वाल, ‘काशिवार्ता’चे पत्रकार श्री. राजेश सेठ, आरोग्य साहाय्य समितीचे डॉ. अजयकुमार जयस्वाल, सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी अन् श्री. राजन केशरी उपस्थित होते. युनायटेड मेडिसिटी रुग्णालयाची नोंदणी रहित करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.