साधकांनी नामजप करतांना ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

सनातन-निर्मित शिवाच्या पालट होत गेलेल्या चित्रांमध्ये शिवाची आधी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा आणि नंतर ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा दाखवल्याचा लक्षात आलेला भावार्थ अन् साधकांनी नामजप करतांना ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

प्रतीकात्मक छायाचित्र

१. ‘वायुतत्त्वा’ची आणि ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा करून ‘त्या मुद्रांचा परिणाम देहाच्या कोणत्या चक्रांवर जाणवतो ?’, हे पहाणे

‘एकदा मी प्रयोग म्हणून दोन्ही हातांच्या बोटांची ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’ ही वायुतत्त्वाची मुद्रा करून ‘त्या मुद्रेचा परिणाम देहाच्या कोणत्या चक्रावर जाणवतो ?’, हे पाहिले. तेव्हा मला माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवल्या. या वायुतत्त्वाच्या मुद्रेला ‘ज्ञानमुद्रा’ किंवा ‘ध्यानमुद्रा’ म्हणतात. सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी आज्ञाचक्र जागृत व्हायला हवे, तसेच मनाचे कार्य थांबवून ध्यानमग्न होण्यासाठीही आज्ञाचक्रावर लक्ष एकाग्र करणे आवश्यक असते. त्यामुळे ‘या दोन्ही कार्यांसाठी वायुतत्त्वाची मुद्रा पूरक आहे’, असे लक्षात आले. त्यानंतर मी दोन्ही हातांच्या बोटांची ‘अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावणे’ ही आकाशतत्त्वाची मुद्रा करून ‘त्या मुद्रेचा परिणाम देहाच्या कोणत्या चक्रावर जाणवतो ?’, हे पाहिले. तेव्हा मला माझ्या सहस्रारचक्रावर संवेदना जाणवल्या.

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

२. सनातनने जानेवारी २०१९ मध्ये निर्माण केलेल्या शिवाच्या चित्रामध्ये शिवाने दोन्ही हातांच्या बोटांनी ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केली असणे, त्या आधीच्या शिवाच्या चित्रामध्ये शिवाने दोन्ही हातांच्या बोटांनी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा केली असणे आणि त्या दोन्ही मुद्रांचा लक्षात आलेला भावार्थ

सनातनने जानेवारी २०१९ मध्ये निर्माण केलेल्या शिवाच्या चित्रामध्ये शिवाने दोन्ही हातांच्या बोटांनी ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केली आहे आणि तो डोळे पूर्णतः मिटून ध्यानस्थ बसलेला आहे. जानेवारी २०१९ च्या अगोदर सनातन-निर्मित शिवाच्या चित्रामध्ये शिवाने दोन्ही हातांच्या बोटांनी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा केली आहे आणि त्याचे डोळे पूर्णतः मिटलेले नसून अर्धोन्मिलित, म्हणजे अर्धे उघडे आहेत आणि त्याची दृष्टी ऊर्ध्व आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी बनवलेल्या शिवाच्या या दोन्ही चित्रांचे अर्थ मला पुढीलप्रमाणे लक्षात आले.

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष २००२ मध्ये निर्माण झालेल्या शिवाच्या चित्रातील त्याच्या ‘ज्ञानमुद्रे’मुळे साधकांना ज्ञानशक्ती मिळून ज्ञान मिळवण्याची प्रेरणा मिळू लागल्याने वर्ष २००३ पासून सनातनच्या काही साधकांना ज्ञान मिळू लागणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच हे सर्व घडवले असणे : शिवाच्या जानेवारी २०१९ च्या अगोदरच्या चित्रामध्ये शिवाने ‘वायुतत्त्वा’ची, म्हणजे ‘ज्ञानमुद्रा’ केली आहे. शिव हा ज्ञानशक्ती देणारा आहे. तेव्हा मी ‘नेमकी केव्हापासून चित्रामध्ये शिवाची ती ज्ञानमुद्रा दाखवण्यात आली ?’, हे शोधले असता लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाचे चित्र प्रथम वर्ष २००० मध्ये निर्माण करण्यात आले. त्यामध्ये सुधारणा करून वर्ष २००२ मध्ये शिवाने दोन्ही हातांनी ज्ञानमुद्रा केल्याचे आणि त्याचे डोळे अर्धोन्मिलित अन् ऊर्ध्व असल्याचे त्याच्या चित्रामध्ये दाखवण्यात आले.’ याचा अर्थ ‘या चित्रामुळेच वर्ष २००२ पासून सनातनच्या साधकांना शिवाकडून ज्ञानमुद्रेद्वारे ज्ञानशक्ती मिळून ज्ञान मिळवण्याची प्रेरणा मिळू लागली’, असे म्हणता येईल; कारण ‘वर्ष २००३ पासून सनातनच्या काही साधकांना जगात कुठेच उपलब्ध नाही असे अध्यात्मशास्त्र समजावून सांगणारे ज्ञान मिळू लागले’, अशी नोंद सनातनच्या इतिहासात आहे. (‘नोव्हेंबर २००३ पासून आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सनातनमध्ये सर्वप्रथम नाविन्यपूर्ण ज्ञान मिळू लागले.’ – संकलक) याचा अर्थ ‘साधकांना मिळणार्‍या ज्ञानाच्या स्त्रोताला वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने निर्माण झालेले शिवाचे चित्र कारणीभूत आहे’, असे लक्षात येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच हे सर्व घडवून आणले. तेव्हापासून आतापर्यंत (वर्ष २०२१ पर्यंत) सनातनच्या साधकांना ज्ञान मिळतच आहे आणि मिळालेल्या या ज्ञानावर आधारित शेकडो ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

२ आ. जानेवारी २०१९ मध्ये शिवाच्या चित्रामध्ये पालट करून त्याची ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा दाखवल्याचे लक्षात आलेले कारण म्हणजे, या मुद्रेमुळे सहस्रारचक्र जागृत होऊन ज्ञानाचा प्रसार होत असल्याने ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी जगभर प्रसार होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिवाच्या चित्रामध्ये काळानुसार पालट करून धर्मप्रसाराच्या कार्याला चालना दिली असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जानेवारी २०१९ मध्ये शिवाच्या चित्रामध्ये पालट सुचवून शिव पूर्णतः ध्यानावस्थेत दाखवायला आणि त्याच्या दोन्ही हातांची ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा दाखवायला सांगितले. याचे कारण मला असे लक्षात आले, ‘साधकांना वर्ष २००३ ते वर्ष २०१९ पर्यंत अनंत ज्ञान मिळाले. आता ईश्‍वरी राज्याची स्थापना होण्यासाठी या ज्ञानाचा प्रसार जगभर होणे आवश्यक आहे. हा प्रसार होण्यासाठी शिवाची आकाशतत्त्वाची मुद्रा साधकांना ऊर्जा देते; कारण या मुद्रेमुळे सहस्रारचक्र जागृत होते आणि ते जागृत झाल्यावर ज्ञानाचा प्रसार सहजतेने होतो.’ सध्या सनातनकडे असलेल्या ज्ञानाचा प्रसार तिचे ग्रंथ, संकेतस्थळे, माहितीजालाद्वारे घेण्यात येणारे (ऑनलाईन) सत्संग, चर्चासत्रे इत्यादींच्या माध्यमांतून विविध भाषांतून जगभर होत आहे. यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिवाच्या चित्रामध्ये काळानुसार पालट करून धर्मप्रसाराच्या कार्याला कशी चालना दिली, हे लक्षात येते.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१७.१.२०२१)

ईश्‍वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले समष्टी जप करतांना साधकांनी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा (ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा) न करता ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केल्यास जगभरच्या समष्टी प्रसाराला गती मिळणार असणे

वायुतत्त्वाची मुद्रा, म्हणजेच ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा ही व्यष्टी साधनेसाठी, चिंतन करण्यासाठी किंवा  ज्ञान मिळवण्यासाठी पूरक असल्याचे, तर आकाशतत्त्वाची मुद्रा ही समष्टी साधनेसाठी पूरक असल्याचे वरील विवेचनावरून लक्षात येते. त्यामुळे साधकांनी आताच्या काळात समष्टी जप (श्री विष्णवे नमः ।, श्री सिद्धिविनायकाय नमः । आणि श्री भवानीदेव्यै नमः । हे जप) करतांना ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा न करता ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा करावी. त्यामुळे जगभरातील समष्टी प्रसाराला गती मिळेल. ईश्‍वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हे समष्टी जप करण्यास सांगितले आहेत. ते करतांना साधकांनी ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केल्यास ईश्‍वरी राज्याची पहाट लवकरात लवकर होईल !’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक