ठाणे येथील संत पू. डॉ. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या कार्याविषयी व्यक्त केलेला विश्‍वास !

मार्च २०२० मध्ये पू. डॉ. राजकुमार केतकर आणि पू. किरण फाटक यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या त्यांच्या संत सन्मानाचे चलत्चित्र (व्हिडीओे) त्यांना पहाण्यासाठी पाठवले होते. त्याविषयी माझे त्यांच्याशी भ्रमणभाषवर संभाषण झाले. त्या वेळी त्यांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. डॉ. राजकुमार केतकर

पू. डॉ. राजकुमार केतकर : ‘मला नृत्यावरील काही ग्रंथ मिळाले आहेत, तसेच माझ्याकडे नृत्याविषयीच्या ध्वनी-चित्रचकत्याही (सीडी) आहेत. त्या मला तुम्हालाच द्यायच्या आहेत; कारण महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून जे कार्य होणार आहे, ते मानवजातीसाठी आहे. त्यामुळे हे सर्व साहित्य तिथे असणे आवश्यकच आहे. ही दळणवळण बंदी संपल्यावर मी माझ्या पूर्ण कुटुंबासहित तिकडे येणारच आहे. नृत्याविषयी माझ्याकडे असलेले ज्ञान मला तुम्हाला द्यायचे आहे. आम्ही स्वतः आश्रमात येऊन तुमचे कार्य पाहिले आहे. त्यामुळे ‘समाजातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत हे कार्य पोचावे’, असे मला पुष्कळ वाटत आहे. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरण केल्यावर ते सतत माझ्या समवेतच असल्याचे मला जाणवते. त्यांना माझा नमस्कार सांगा.’

नृत्याचार्य पू. डॉ. राजकुमार केतकर यांनी सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार

कु. तेजल पात्रीकर

१. सनातन संस्था सध्याच्या काळाच्या दृष्टीने पुष्कळ महत्त्वाचे कार्य करत असणे : ‘१२.३.२०२० या दिवशी नृत्याचार्य पू. डॉ. राजकुमार केतकर यांच्याशी माझे भ्रमणभाषवर बोलणे झाले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सनातन संस्था सध्याच्या काळाच्या दृष्टीने पुष्कळ महत्त्वाचे कार्य करत आहे. सनातन संस्थेविषयी समाजात पुष्कळ अपप्रचार झाला आहे. आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून आल्यावर ‘सनातन संस्थेविषयी प्रसारमाध्यमांनी जे चित्र निर्माण केले आहे, त्यात तीळमात्रही तथ्य नाही’, हे मला लोकांना सांगायचे आहे. हे मी माझ्या नातेवाइकांनाही सांगितले आहे.’’

२. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संगीत क्षेत्रातील संशोधन जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचावे’, असे वाटणे आणि त्यासाठी नृत्यशाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात संशोधनाचा विषय मांडण्यासाठी साधकांना बोलावणार असल्याचे सांगणे : नृत्याचार्य पू. डॉ. केतकर यांनी त्यांच्या नृत्यशाळेच्या वार्षिक उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची माहिती सांगण्याची संधी दिली होती. या संदर्भात बोलतांना ते म्हणाले, ‘‘यापुढे होणार्‍या आमच्या नृत्याविषयीच्या कार्यक्रमांत मी तुलाही बोलावणार आहे. ‘आपले संगीत क्षेत्रातील संशोधन जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचावे’, असे मला वाटते.’’

– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.


डोंबिवली येथील संत पू. किरण फाटक यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या कार्याविषयी व्यक्त केलेला विश्‍वास !

पू. किरण फाटक

‘तुमची ध्वनी-चित्रीकरणापासूनची सर्व यंत्रणा अतिशय सुंदरच आहे. तुम्ही करत असलेल्या एवढ्या परिपूर्ण कार्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. सगळेच अप्रतिम आहे. त्यामुळे माझ्याकडे असलेले संगीताचे सर्व ज्ञान मला तुम्हाला द्यायचे आहे; नाहीतर हे सर्व माझ्या समवेतच जाईल. त्यामुळे मी आणखी २ – ३ वेळा तरी गोव्याला आश्रमात येणार आहे. मला ठाऊक असलेले संगीतातील ज्ञान मला पुढच्या पिढीसाठी तुम्हाला देऊन ठेवायचे आहे. ‘तुम्ही येणार्‍या मानवजातीसाठी फार मोठे कार्य करत आहात’, हे आम्ही स्वतः तेथे आश्रमात येऊन पाहिले आहे. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) माझा नमस्कार सांगा.’

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२०)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून दर्शन देणे आणि त्यांचे स्मरण केल्यावर ‘ते माझ्या जवळच आहेत’, असे जाणवणे

‘सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात ३ दिवस वास्तव्य करून २७.१.२०२० या दिवशी आम्ही मुंबई येथे घरी परतलो. दुसर्‍या दिवशी मी नेहमीप्रमाणे पहाटे उठलो, तर मला माझ्या समोर आसंदीत परात्पर गुरु डॉ. आठवले बसलेले दिसले. तेव्हा मला वाटले, ‘अरे, मी गोव्यात आहे कि काय ?’ नंतर माझ्या लक्षात आले, ‘मी तर माझ्या घरीच आहे.’ पहाटेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला दर्शन दिल्याची पुष्कळ संस्मरणीय अनुभूती मला आली. आता मी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण केले, तरी ‘ते माझ्या जवळच आहेत’, असे मला जाणवते.’

– नृत्याचार्य पू. डॉ. राजकुमार केतकर, ठाणे

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक