पू. अशोक पात्रीकरकाका यांनी म्हटलेल्या भजनांचा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून अनुभवलेला परिणाम

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘१६.१२.२०२० या दिवशी पू. अशोक पात्रीकरकाका यांनी प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वतः रचलेल्या आणि म्हटलेल्या भजनांपैकी काही भजने ‘प्रयोग’ म्हणून म्हटली. सूक्ष्मातील परिणामाचा अभ्यास करावयाच्या या प्रयोगात ‘पू. पात्रीकरकाकांच्या मुखातून हे भजन ऐकल्याने काय स्पंदने जाणवतात ? काय अनुभूती येते ? भावाच्या स्तरावर काय जाणवते ? वातावरणावर काय परिणाम होतो ? स्वतःच्या प्रभावळीवर काय परिणाम होतो ?’ इत्यादी अनुभवायचे होते. प्रत्येक भजनाचा योग्य तेवढा परिणाम होण्यासाठी पू. पात्रीकरकाकांनी प्रत्येक भजन ५ वेळा म्हटले. ही भजने ऐकून मला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

पू. अशोक पात्रीकर

१. ‘गोविंद लिजो प्रभू गोपाल लिजो…’ हे हिंदी भजन म्हणणे

अ. आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

आ. भजनाला आरंभ झाल्यावर त्याची स्पंदने प्रथम मला माझ्या मणिपूरचक्रावर जाणवली. त्यानंतर भजनाची स्पंदने वरच्या वरच्या चक्रांवर जाणवू लागली आणि शेवटी ती सहस्रारचक्रावर जाणवली. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

इ. माझे शरीर ‘एकदा डावीकडे-एकदा उजवीकडे’, असे हळूवारपणे डोलू लागले. मला आनंद जाणवू लागला.

ई. भजन म्हणणे पूर्ण झाल्यावर पू. पात्रीकरकाका थांबले. तेव्हा त्या निःशब्द स्थितीत भजनाची निर्गुण स्पंदने मला माझ्या मूलाधारचक्रावर जाणवली. तेव्हाही माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. मूलाधारचक्रावर ती स्पंदने अर्धा मिनिट टिकली आणि ती लय पावल्यावर माझी सूर्यनाडी पुन्हा कार्यरत झाली.

उ. पू. पात्रीकरकाकांनी दुसर्‍यांदा भजन म्हणणे आरंभ करण्यापूर्वी मी त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्याकडून चैतन्याची पिवळसर स्पंदने प्रक्षेपित होत होती. त्यांनी भजन म्हणणे आरंभ केल्यावर त्यांच्याकडून भावाची निळसर रंगाची स्पंदने प्रक्षेपित होऊ लागली.

ऊ. पू. पात्रीकरकाका गात असलेल्या भजनाची स्पंदने मला सहस्रारचक्रावर जाणवू लागली. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली आणि या वेळीही मी डोलू लागलो.

ए. भजन थांबल्यावर भजनाची निर्गुण स्पंदने मला माझ्या मूलाधारचक्रावर जाणवू लागली. तेथे ती स्पंदने दीड-दोन मिनिटे टिकली आणि मग स्पंदने मणिपूरचक्रावर जाणवू लागली. तेव्हा माझी आरंभीप्रमाणे सूर्यनाडी कार्यरत झाली. या वेळी मूलाधारचक्रावर स्पंदने टिकून रहाण्याचा कालावधी वाढला होता.

ऐ. पू. पात्रीकरकाकांनी तिसर्‍यांदा भजन म्हणणे आरंभ केल्यावर मला पुन्हा सहस्रारचक्रावर भजनाची स्पंदने जाणवू लागली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. माझे ध्यान लागू लागले. त्या अवस्थेतही मी थोडाफार डुलत होतो.

ओ. भजन थांबले, तरी माझे ध्यान लागलेलेच होते; पण मला आजूबाजूची चाहूलही लक्षात येत होती. या वेळी मूलाधारचक्रावर भजनाची निर्गुण स्पंदने पोचल्यावर तेथे ती स्पंदने २-३ मिनिटे टिकली आणि त्यानंतर मला मणिपूरचक्रावर स्पंदने जाणवू लागली. या वेळी मूलाधारचक्रावर स्पंदने टिकून रहाण्याचा कालावधी आणखी वाढला होता.

औ. चौथ्यांदा भजनाला आरंभ झाल्यावर माझे आणखी गाढ ध्यान लागले. मला माझ्या देहाची जाणीव उरली नाही. त्यानंतर भजन कधी थांबले, हे मला कळले नाही.

तसेच पू. पात्रीकरकाकांनी पाचव्यांदा भजन कधी म्हटले आणि त्यांनी प्रयोगासाठी हे भजन म्हणणे कधी थांबवले, हेही मला कळले नाही.

१ अ. निष्कर्ष

१. पू. पात्रीकरकाकांनी म्हटलेल्या ‘गोविंद लिजो प्रभू गोपाल लिजो…’ या हिंदी भजनाचा परिणाम सहस्रारचक्रापर्यंत झाला.

२. भजनामुळे सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

३. पू. पात्रीकरकाकांकडून भावाची निळसर रंगाची स्पंदने प्रक्षेपित होत होती, तसेच भजनामुळे आनंदही मिळत होता.

४. त्यांनी तिसर्‍यांदा आणि चौथ्यांदा ते भजन म्हटल्यावर ते ऐकतांना मला ध्यानावस्था प्राप्त झाली. याचा अर्थ भजनाचा परिणाम वाढत जाऊन तो आनंदाच्या पुढे शांतीच्या टप्प्यालाही गेला.

५. पू. पात्रीकरकाकांनी ‘गोविंद लिजो प्रभू गोपाल लिजो…’ हे भजन पाचदा म्हटले. प्रत्येक भजनानंतर ते जेव्हा थोडा वेळ थांबले, तेव्हा भजनाची निर्गुण स्पंदने वातावरणात असलेल्या त्या कालावधीत मला काही वेळ मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवली. प्रत्येक भजनानंतर मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवण्याचा कालावधी वाढत गेला. याचा अर्थ प्रत्येक भजनानंतर भजनाचा वातावरणावर परिणाम टिकण्याचा कालावधी वाढत गेला.

२. ‘एक तुझे नाम, शास्त्रांचा आधार….’ हे मराठी भजन म्हणणे

अ. आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.

आ. भजनाला आरंभ झाल्यावर त्याची स्पंदने मला माझ्या मणिपूरचक्रावर जाणवू लागली.

इ. भजन ऐकून माझी भावजागृती झाली. तेव्हा मला भजनाची स्पंदने स्वाधिष्ठानचक्रावर जाणवली. त्यानंतर भजनाची स्पंदने सहस्रारचक्रापर्यंत गेली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

ई. सहस्रारचक्रावर भजनाची स्पंदने जाणवत असतांना मी प्रयोग म्हणून डोळे बंद करून भजन ऐकले, तेव्हा मला माझ्या मूलाधारचक्रावर भजनाची स्पंदने जाणवली आणि मी डोळे उघडले असता मला पुन्हा सहस्रारचक्रावर भजनाची स्पंदने जाणवली. मी पुन्हा डोळे बंद केले असता मला मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवली आणि माझे ध्यान लागू लागले. यातून असे लक्षात आले, ‘डोळे मिटलेे असता अंतर्मुखता साधली जात असल्याने भजनाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवली आणि डोळे उघडे ठेवले असता समष्टीशी संबंधित जाणीव असल्याने सहस्रारचक्रावर भजनाची स्पंदने जाणवली. अंतर्मुखता ही मूलाधारचक्राशी संबंधित आहे आणि समष्टीशी अनुसंधान हे सहस्रारचक्राशी संबंधित आहे.’

उ. हे भजन नामाची महती सांगणारे असल्याने ते अधिकतर निर्गुण स्तरावरील स्पंदने प्रक्षेपित करणारे जाणवले. जेव्हा पू. पात्रीकरकाकांनी भजन तिसर्‍यांदा म्हणणे आरंभ केले, तेव्हा माझे ध्यान लागू लागले. ध्यानाच्या स्थितीत माझे भजनामुळे डावीकडे-उजवीकडे डोलणेही थोडेफार होत होते. त्यानंतर मी प्रयोगाच्या शेवटपर्यंत ध्यानावस्थेत होतो.

२ अ. निष्कर्ष

१. ‘एक तुझे नाम, शास्त्रांचा आधार….’ हे प.पू. भक्तराज महाराज रचित मराठी भजन पू. पात्रीकरकाकांनी गायल्यावर त्या भजनाची स्पंदने मला माझ्या सहस्रारचक्रावर जाणवली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

२. डोळे मिटले असता अंतर्मुखता साधली जात असल्याने भजनाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवली आणि डोळे उघडे ठेवले असता समष्टीशी संबंधित जाणीव असल्याने सहस्रारचक्रावर भजनाची स्पंदने जाणवली. यावरून ‘अंतर्मुखता ही मूलाधारचक्राशी संबंधित आहे आणि समष्टीशी अनुसंधान हे सहस्रारचक्राशी संबंधित आहे’, हे लक्षात आले.

३. हे भजन नामाची महती सांगणारे असल्याने ते अधिकतर निर्गुण स्तरावरील स्पंदने प्रक्षेपित करणारे असल्याने माझे ध्यान लागले.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.१२.२०२०)

• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक