हिंदु महिलांविषयी अश्‍लाघ्य टिपणी असलेल्या कादंबरीला केरळ साहित्य अकादमीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीचा पुरस्कार !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. साम्यवादी आघाडी सरकार सत्तेत असलेल्या केरळमधील साहित्य अकादमीकडून याहून वेगळी अपेक्षा तरी काय करणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होणे आवश्यक आहे; मात्र हिंदू निष्क्रीय असल्याने साम्यवादी, पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांचे फावते आहे !

एस्. हरीश

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ साहित्य अकादमीने वर्ष २०१९ साठी एस्. हरीश या लेखकाच्या ‘मीशा’ या कादंबरीला ‘सर्वश्रेष्ठ कादंबरी’ म्हणून घोषित केले आहे. या कादंबरीमध्ये हिंदूंच्या महिला आणि मंदिरांतील पुजारी यांचा अवमान करण्यात आला आहे. यात म्हटले आहे, ‘हिंदु महिला नटून थटून मंदिरात जातात; कारण त्या लोकांना आणि विशेष करून पुजार्‍यांना हे दर्शवत असतात की, त्या शारीरिक संबंधाला सिद्ध आहेत.’

ही कादंबरी केरळमधील मल्ल्याळम् भाषेतील साप्ताहिक ‘मातृभूमी’मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. याचे ३ भाग प्रसिद्ध करण्यात आल्यावर ती बंद करण्यात आली होती. त्यानंतर ती पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कारण देत सर्वोच्च न्यायालयाकडून कादंबरीवर बंदी घालण्यास नकार !

वर्ष २०१८ मध्ये या कादंबरीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली या कादंबरीवर बंदी घालण्यास नकार दिला होता.

न्यायालयाने याचिकाकर्त्याला म्हटले होते की, तुम्ही अशा गोष्टींना अनावश्यक महत्त्व देत आहात. इंटरनेटच्या युगात तुम्ही याला अनावश्यक मुद्दा बनवत आहात. (विविध माध्यमांद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्यामुळे हिंदू न्याय मिळण्याच्या आशेने न्यायालयात याचिका प्रविष्ट करतात; मात्र न्यायालय जर असा निर्णय देत असेल, तर हिंदूंनी कुणाकडे आशेने पहायचे ? – संपादक)

हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न ! – भाजप

राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी म्हटले की, या पुरस्काराकडे हिंदूंच्या विरोधातील कारवाईच्या स्वरूपात पाहिले गेले पाहिजे.

मी अशी अवमानकारक कादंबरी पाहिलेली नाही. हा शबरीमला प्रकरणानंतरचा हिंदूंचा अवमान करण्याचा दुसरा प्रयत्न आहे. ही एक अवमानाची मालिकाच आहे.