जर्मन बेकरी स्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानात

  • भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांना पाकमध्ये प्रशिक्षण दिले जाते आणि याची संपूर्ण माहिती भारताकडे आहे; आतंकवादीनिर्मितीचे कारखाने चालूच असल्याने भारताने कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी आतंकवादी संपत नाहीत ही, वस्तूस्थिती आहे !
  • जगाच्या कोणत्याही देशात इतकी वर्षे अशी एखादी भीषण समस्या तशीच भिजत ठेवल्याची उदाहरणे विरळ असतील !
  • भारताने किती आतंकवाद्यांना आतापर्यंत फाशी दिली ? आतंकवाद नष्ट करण्याची क्षमता भारतीय निमलष्करी दल आणि सैन्यदल यांच्यात असूनही तो पोसला जाणे, हे दुर्दैव आहे !

पुणे – कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या प्रमुख संशयितांनी त्यांचे बस्तान पाकिस्तानात बसवल्याची तपास यंत्रणांची माहिती आहे. या स्फोटाला १३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी १० वर्षे पूर्ण होत आहेत; मात्र या बॉम्बस्फोटातील ७ पैकी ४ आरोपी अद्याप पसार आहेत. या स्फोटात सायबर आक्रमण झाले होते.

काय आहे जर्मन बेकरी प्रकरण ?

जर्मन बेकरीमधील बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिद्दीनच्या आतंकवाद्यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. बेगसह ७ जणांवर दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. त्यात मोहसीन चौधरी, यासिन भटकळ, रियाझ भटकळ, इक्बाल भटकळ, फय्याज कागझी, जबुउद्दीन अन्सारी यांचा समावेश होता. सत्र न्यायालयाने बेग याला फाशीची शिक्षा दिली होती. त्यानंतर १५ सप्टेंबर २०१३ या दिवशी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासीन भटकळ याला इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि रॉ यांनी नेपाळच्या सीमेवर अटक केली. या प्रकरणी बेगचा संबंध नसल्याचा दावा करत यासीनने या बॉम्बस्फोटातील सहभागाची कबुली दिली होती. उच्च न्यायालयाने जर्मन बेकरी खटल्यात बेगची फाशीची शिक्षा रहित केली; मात्र आर्डीएक्स बाळगले आणि बनावट कागदपत्रे सिद्ध केल्याच्या २ आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासीन भटकळ याला वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात वर्ग करून घेतले आहे. भटकळ सध्या तिहार कारागृहात आहे. भटकळ त्याचा भाऊ इक्बाल भटकळ, पुण्याचा मोहसीन चौधरी, बीडचा जबीउद्दीन अन्सारी उपाख्य अबू जिंदाल हे चौघेही पाकिस्तानात असल्याची अन्वेषण यंत्रणांची माहिती आहे. चारही आरोपींसाठी लुकआऊट नोटीस जारी केली असून त्यांना पकडण्यासाठी इंटरपोलचेही साहाय्य घेण्यात येत आहे.