‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा करतांना सौ. मधुरा कर्वे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ऑक्टोबर २०१७ मध्ये मला सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनपर लेख लिहिण्यास शिकण्याची संधी मिळाली. मला सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांकडून आध्यात्मिक संशोधनांवर लेख लिहिण्याच्या संदर्भातील पुष्कळ बारकावे शिकायला मिळाले. त्यानंतर गुरुदेवांच्या कृपेने संशोधनाच्या लेखांचे संकलन करण्याची संधी मिळाली. या सेवा शिकतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुमाऊलीच्या कोमल चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.

काल या लेखात आपण मराठी भाषेतून निर्माण होणारी सकारात्मक स्पंदने, संकलनाची सेवा शिकतांना ठेवलेला भाव आदींविषयी पाहिले. आजच्या लेखात संकलनाची सेवा परिपूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी पाहूया.

भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराhttps://sanatanprabhat.org/marathi/449461.html

६. सेवा करतांना लक्षात आलेले स्वभावदोष आणि त्यांवर केलेली मात !

६ अ. चुकांमुळे मन अंतर्मुख झाल्यावर उतावळेपणा या दोषाची जाणीव होणे : संशोधनाचे लेख पडताळणारे परात्पर गुरु डॉक्टर लेखातील व्याकरण आणि संकलन यांसंदर्भातील चुका लक्षात आणून देतांना मला त्याचा ताण नाही येणार, अशा पद्धतीने देतात, उदा. हरितालिका व्रत या लेखात काही ठिकाणी शकुंतला हा शब्द टंकलिखित करतांना मी शंकुतला असा केला होता. त्यावर त्यांनी लेखात शंकुतलाचे शकुंतला करणे, असे लिहिले होते. तेव्हा मला त्या चुकीची पुष्कळ खंत वाटली. पूर्वी शब्दांच्या चुका लक्षात आणून दिल्यावर मी कृतीच्या स्तरावर योग्य शब्द १० वेळा लिहून काढत असे; परंतु या वेळी मन पूर्ण अंतर्मुख झाले. माझ्याकडून टंकलेखनातील अशा ढोबळ चुका मुळीच अपेक्षित नाहीत. असे का होत आहे ?, याचे मी चिंतन केल्यावर माझ्यातील उतावळेपणा या स्वभावदोषाची जाणीव होऊन त्यावर कठोर प्रयत्न करण्याची तीव्र तळमळ माझ्यामध्ये निर्माण झाली.

सौ. मधुरा कर्वे

६ आ. परिपूर्ण सेवेचा ध्यास लागल्याने उतावळेपणा टाळून सेवा केल्यावर चुकांचे प्रमाण अल्प होऊन सेवेतील आनंद अनुभवता येणे : मी टंकलेखन करतांना घाई न करता एक-एक शब्द शांतपणे टंकलिखित करण्याचा प्रयत्न चालू केला. त्यामुळे टंकलेखन करतांना अनुस्वार, वेलांटी, उकार, रफार यांच्या होणार्‍या चुका टाळता येणे शक्य झाले. चुकीचे शब्द टंकलिखित करणे आणि नंतर ते सुधारणे, यांमध्ये जो वेळेचा अपव्यय होत असे, तो शांतपणे टंकलेखन केल्याने वाचतो आणि सेवा अन् साधना यांची फलनिष्पत्तीही वाढते, हे माझ्या लक्षात आले. मी शांतपणे टंकलेखन करण्यास आरंभ केल्याने टंकलेखनाची गती टिकून राहून गुणवत्ता वाढली. परिपूर्ण सेवेचा ध्यास लागल्याने चुकांचे प्रमाण अल्प होऊन मला सेवेतील आनंद अनुभवता येऊ लागला.

६ इ. आरंभी समन्वयाची सेवा करण्याचा ताण येणे; परंतु छायाचित्राच्या सेवेसाठी ती करणे आवश्यक असल्याने स्वयंसूचना देऊन ती सेवा करणेे आणि दायित्व घेऊन सेवा केल्याने आत्मविश्‍वास निर्माण होणे : वर्ष २०१८ मध्ये संशोधन लेखासमवेत कोणते छायाचित्र जोडू शकतो ?, याचा विचार करून ते छायाचित्र जोडून लेख पडताळण्यासाठी द्यावा, असे एका परात्पर गुरु डॉक्टरांनी कळवले. आरंभी त्याविषयी फारसा विचार माझ्याकडून होत नसे. उत्तरदायी साधिका मला त्याविषयी आठवण करून देत. तेव्हा कोणते छायाचित्र जोडू शकतो ?, याचा विचार करून मी केवळ तशी सूचना लेखात लिहू लागले. परात्पर गुरु डॉक्टरांनी पुन्हा एकदा मला धारिकेत केवळ अमुक छायाचित्र घेणे, अशी सूचना न लिहिता प्रत्यक्ष छायाचित्र जोडावे, असे कळवले. तेव्हा माझ्याकडून होणार्‍या चुकीची मला खोलवर जाणीव झाली. त्यानंतर माझ्याकडून लेखासह कोणते छायाचित्र जोडू शकतो ?, याचा विचार होऊन ते कसे मिळवायचे ?, यासाठीही प्रयत्न होऊ लागले. गत ७ – ८ वर्षांपासून कुणाशीही भ्रमणभाषवर अथवा प्रत्यक्ष बोलण्याचा मला पुष्कळ ताण यायचा. त्यामुळे शक्यतो समन्वय करणे, मी टाळत असे. लेखासाठी छायाचित्र मिळवायचे, तर संबंधित साधकांशी समन्वय करणे आवश्यक होते. मी मनाला स्वयंसूचना देऊन आणि प्रार्थना करून समन्वय करणे चालू केले. तेव्हा अशक्य वाटणारी गोष्ट गुरुकृपेने सहज शक्य झाली. आता मला समन्वयाच्या सेवेचा ताण येत नाही. दायित्व घेऊन सेवा केल्याने माझ्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला.

६ ई. चुकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटल्याने चुकांची भीती न वाटता त्या टाळण्यासाठी प्रयत्न होणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी चुकांतून कसे शिकायचे ?, हे लक्षात आणून देऊन मला शिकण्यातला आनंद अनुभवण्यास दिला. आता चुकांमधून शिकून त्या सुधारून पुढे जायचे आहे, ही जाणीव माझ्या मनात सतत जागृत रहाते. त्यामुळे चुका झाल्यावर मनाला पूर्वीप्रमाणे निराशा न येता नवीन जोमाने प्रयत्न करण्यासाठी मन सकारात्मक असते. संकलनाच्या सेवेच्या माध्यमातून माझ्यातील निष्काळजीपणा, उतावळेपणा, लक्षपूर्वक सेवा न करणे, अभ्यासपूर्वक सेवा न करणे, चिकाटी नसणे, शिकण्याची वृत्ती नसणे, नकारात्मक विचार करणे, आत्मविश्‍वासाचा अभाव, न्यूनगंड इत्यादी स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंवर मात करण्यासाठी मनापासून प्रयत्न झाले. माझा चुकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटल्याने मला चुकांची भीती न वाटता त्या टाळण्यासाठी कसे प्रयत्न करू शकतो ?, याचे चिंतन होते. त्यामुळे माझे मन उत्साही, सकारात्मक आणि आनंदी असते.

७. सेवा अभ्यासपूर्ण करण्याचे महत्त्व लक्षात येणे

हरितालिका व्रत या संशोधन लेखात पूजनाच्या मांडणीमध्ये पूजनापूर्वीच पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले. मी हरितालिका पूजेच्या मांडणीची दोन छायाचित्रे निवडून ती हरितालिका व्रत या लेखाला जोडली होती. ती छायाचित्रे पाहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी छायाचित्रांविषयी पुढील सूत्र सांगितले – पूजेची मांडणी धर्मशास्त्रानुसार आणि भावपूर्ण केल्यास त्यातून चांगली स्पंदने येऊ शकतात. तेव्हा छायाचित्रांचा अभ्यास कसा करावा ?, हे मला शिकता आले. यातून कोणतीही सेवा अभ्यासपूर्ण करणे आवश्यक आहे, हे लक्षात आले.

८. परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या सूचनांतून नवनवीन प्रयोगांच्या संकल्पना सिद्ध होणे

एखाद्या प्रयोगाच्या वैज्ञानिक चाचणीतील निरीक्षणे, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी, निरीक्षणांचे विवेचन आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र या सूत्रांसंदर्भात परात्पर गुरु डॉक्टर लेखात काही सूचना देत. तेव्हा माझे त्याविषयी चिंतन होऊन नवनवीन सूत्रे लक्षात येत. त्यांची शिकवण्याची ही अनोखी पद्धत पाहून मन अवाक् होते, उदा. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यावर त्याचा साधकांवर काय परिणाम होतो ?, हे अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी केली होती. त्यावर आधारित संशोधनाचा लेख लिहून तो त्यांना पडताळण्यासाठी दिला. तेव्हा त्यांनी धारिकेत पुढील सूचना केली – श्रीरामाच्या नामजपाचा प्रयोगही घ्यावा. त्यामुळे दोन्हींची तुलना करता येईल. त्याप्रमाणे तो प्रयोग घेऊन त्यांची तुलना केल्यावर लक्षात आले की, स्तोत्रपठण करण्याच्या तुलनेत नामजप करणे पुष्कळ अधिक लाभदायी आहे, तसेच दोन्हींमागील उद्देशांत भेद आहे.

हा लेख पडताळल्यावर त्यांनी सूचना केली, अन्य देवतांशी संबंधित नामजपांचे प्रयोगही घेणे. यातून नवनवीन प्रयोगांच्या संकल्पना सिद्ध होऊ लागल्या. गुरुमाऊलींच्या कृपेने पुढे विविध विषयांवर नवनवीन प्रयोग आणि त्यांच्या संकल्पना सुचण्यास आरंभ झाला.

९. संशोधनाच्या लेखांमध्ये निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्र लिहितांना गुरुमाऊलीची अनुभवलेली कृपा !

संशोधनांचे लेख लिहिण्यासाठी यू.ए.एस्. उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचा (रिडिंगचा) अभ्यास करतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने त्यातील बारकावे माझ्या पटकन लक्षात येतात. लेखात ते बारकावे कशा पद्धतीने मांडावेत ?, याचे चिंतन करतांना नवनवीन संकल्पना सुचतात. वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेल्या निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्र लिहितांना मनात विचार येतो, निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्र आपल्या (सनातनच्या) कोणत्या ग्रंथात मिळेल ? तेव्हा त्या ग्रंथाचे नाव तात्काळ मनात येते. सदर ग्रंथाची अनुक्रमणिका पाहून लिखाणासाठी आवश्यक लिखाण कोणत्या सूत्रात मिळेल ? याची लगेच कल्पना येते. (वर्ष २०१२ ते २०१६ सलग ५ वर्षे मी ग्रंथाशी संबंधित संकेतस्थळाची सेवा करतांना नवीन प्रकाशित झालेले ग्रंथही माझ्या वाचनात आले होते. त्यामुळे कोणत्या ग्रंथात कोणते लिखाण मिळेल ?, याची पुसटशी कल्पना येते. मला संशोधनाच्या लेखांमध्ये अध्यात्मशास्त्राची सूत्रे लिहितांना त्याचा पुष्कळ लाभ झाला.) काही वेळा संशोधनांचे विषय निराळे असतात. तेव्हा त्यांचे शास्त्र ग्रंथात मिळणे शक्य होत नाही. अशा वेळी गुरुमाऊलीला शरण गेल्यावर त्याचे शास्त्र आपोआप सुचते.

१०. प्रसारातील साधकांना संशोधन लेख लिहिण्यासाठी सिद्ध करण्याची सेवा मिळाल्यावर ती समष्टी साधना असून गुणांचा विकास आणि स्वभावदोष अन् अहं न्यून करणे यांसाठी संधी असल्याचे जाणवणे

जानेवारी २०१९ मध्ये गुरुकृपेने मला प्रसारातील साधकांना संशोधनांचे लेख लिहिण्यासाठी सिद्ध करण्याच्या सेवेची संधी मिळाली. आरंभी माझ्या मनात नकारात्मक विचार आला, मला ही सेवा अजून नीट येत नाही, तर मी अन्य साधकांना ती कशी काय शिकवणार ? त्या वेळी सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांनी दिलेला दृष्टीकोन आठवला. त्यांनी सांगितले होते, देव एखादी सेवा मला काहीतरी येते; म्हणून देत नाही, तर ती सेवा शिकून घ्यायची आहे; म्हणून देतो. त्यामुळे सतत शिकण्याच्या स्थितीत राहून शिकण्यातील आनंद घ्यावा. तेव्हा मन सकारात्मक होऊन स्थिरावले. त्यानंतर मनात पुढील विचार आला, संशोधनाचे लेख लिहिण्याच्या सेवेतून माझी व्यष्टी साधना झाली. आता ही सेवा सहसाधकांना शिकवतांना माझी व्यष्टीसह समष्टी साधनाही होणार आहे. समष्टी साधनेतून व्यष्टी साधनेच्या अंतर्गत नेतृत्वगुण, नियोजन कौशल्य, निर्णयक्षमता, इतरांचा विचार करणे, प्रेमभाव आदी अनेक गुण माझ्यामध्ये विकसित होतील, तसेच मला माझ्यातील भावनाशीलता, पुढाकार न घेणे, नकारात्मक विचार, न्यूनगंड, अपेक्षा आदी स्वभावदोष अन् अहं यांच्या पैलूंवर प्रयत्न करण्यास पुष्कळ वाव मिळेल.

माझ्या स्वभावदोषांमुळे ही सेवा लवकर शिकून घेण्यास मी पुष्कळ अल्प पडत आहे. यासाठी देवाचरणी क्षमायाचना करते. परात्पर गुरु डॉक्टरांना संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करते, हे गुरुमाऊली, ही सेवा तुम्हीच मला दिली आहे. तुम्हीच ती माझ्याकडून करवून घेणार आहात, अशी माझी श्रद्धा आहे. या सेवेतून तुम्हाला अपेक्षित अशी साधना होण्यासाठी माझ्याकडून तळमळीने प्रयत्न होऊ देत.   (समाप्त)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१०.९.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक