‘ओटीटी’ माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमावली करणार ! –  प्रकाश जावडेकर

 हिंदूंच्या वाढत्या तक्रारींनंतर सरकारचा निर्णय !

हिंदूंनी वारंवार तक्रारी केल्यानंतर आणि विषय लावून धरल्यानंतर सरकारने नियमावली करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि राष्ट्रविरोधी असणार्‍या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !

मुंबई – ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी लवकरच नियमावली घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

प्रकाश जावडेकर

सध्या विविध ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवरील वेब मालिकांतून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर मोठ्या प्रमाणात आघात होत आहेत. त्यामुळे हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या जात आहेत. या आघातांविरुद्ध हिंदुत्वनिष्ठांनी वेळोवेळी वैध मार्गाने आवाज उठवला, तसेच तक्रारीही प्रविष्ट केल्या. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजवर मुक्त असलेल्या या माध्यमावर निर्बंध (सेन्सॉरशिप) लागू होणार आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये ‘सेक्रेड गेम्स १ आणि २’, ‘लैला’, ‘दिल्ली क्राइम’, ‘अभय २’, ‘हसमुख’, ‘पाताल लोक’, ‘ट्रीपल एक्स २’, ‘अ सुटेबल बॉय’, ‘तांडव’ आणि ‘मिर्झापूर’ या वेब सिरीज वादाच्या भोवर्‍यात सापडल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर ‘ओटीटी’वर निर्बंध लागू करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न चालू होते. तथापि सरसकट ‘सेन्सॉरशिप’ लागू होऊ नये; म्हणून १५ ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’नी एकत्र येत ‘स्वयं-नियमावली’ सिद्ध केली होती; पण त्या नियमावलीमध्ये अनेक त्रुटी असल्याने ती नाकारण्यात आली होती. त्यानंतर ‘ओटीटी’ माध्यमांना माध्यमे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत आणण्यात आले; परंतु ‘ओटीटी’वर प्रदर्शित होणारे चित्रपट, वेब मालिका आणि डिजिटल वृत्तपत्रे हे ‘प्रेस कौन्सिल कायदा’, ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा’ वा ‘सेन्सॉर बोड’ यांच्या अखत्यारीत येत नव्हते.