पुणे – विलंबाने झालेला धान्यपुरवठा, तसेच यंत्रामधील तांत्रिक अडचणी यांमुळे डिसेंबरचे धान्य वितरण रखडले आहे. अनेक जिल्ह्यांतील अनुमाने २४ लाख शिधापत्रिका धारकांना धान्य मिळालेले नाही. त्यामुळे ‘उर्वरित धान्य वितरण करण्यासाठी जानेवारी महिन्याची सवलत द्यावी’, अशी मागणी राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. बीड जिल्हा धान्य वितरणामध्ये सर्वांत मागे आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे शहर आणि ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांचा नियोजनशून्य कारभार अन् वाहतूक व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी या कारणांमुळे अनेक मासांपासून अन्नधान्य नियोजित वेळेत पोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे धान्य वितरण प्रलंबित आहे, असा आरोप महासंघाचे अध्यक्ष डी.एन्. पाटील यांनी केला.
राज्यात ३३५ दुकानदारांचे धान्य वितरण ० टक्के आहे, तर ७६८ दुकानांचे धान्य वितरण ३० टक्क्यांहून अल्प आहे. २ सहस्र १२० दुकानांचे धान्य वितरण ६० टक्क्यांहून न्यून आहे. धान्य वितरण प्रलंबित रहाण्याची अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे आहेत. आधार सर्व्हरमधील तांत्रिक समस्या, तसेच तो वारंवार बंद पडणे, संगणकीय प्रणाली योग्य नसणे अशा समस्या उद़्भवत आहेत. डिसेंबरमधील प्रलंबित धान्य वितरण पूर्ण करण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ न देता संपूर्ण जानेवारीत वितरण करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी पुणे शहर दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी केली आहे.
संपादकीय भूमिका
|