हत्तींची समस्या सुटण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार !  

सिंधुदुर्गातील हत्तींच्या समस्येविषयी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत मागितली माहिती

प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींमुळे शेतकरी आणि बागायतदार यांची मोठी हानी होत आहे. गेल्या ५ वर्षांत हत्तींनी बागायतदारांची किती हानी केली, किती जीवितहानी केली, तसेच दोडामार्ग तालुक्यात किती हत्ती आहेत, याची माहिती मिळावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत उपवनसंरक्षक रेड्डी यांच्याकडे मागितली आहे.

दोडामार्ग तालुक्यात हत्तींमुळे शेतकरी आणि बागायतदार यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. हत्तींमुळे येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे येथे असलेल्या हत्तींना पकडून वन खात्याच्या राखीव जंगलात किंवा प्राणी संग्रहालयात सोडणे आदी प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत का ? मनुष्य वस्तीमध्ये हत्ती फिरत असल्याने दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती व्यक्तींचा हत्तींच्या आक्रमणात मृत्यू झाला, याचीही माहिती मसुरकर यांनी माहितीच्या अधिकारात मागितली आहे.

मुख्यमंत्री, वनमंत्री, मुख्य वनसंरक्षण मंत्रालय, वन विभागाचे अधिकारी (सिंधुदुर्ग) आणि जिल्हाधिकारी यांनी मानवाचे संरक्षण करण्याचे दायित्व पार पाडले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार, असे मसुरकर यांनी स्पष्ट केले.