पारंपरिक स्वागतासह पोलीस मानवंदना बंद !
मुख्यमंत्र्यांचा निर्णय !
चंद्रपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्यावर असतांना ‘अधिकार्यांनी स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणू नयेत, तसेच पोलीस दलाकडून मानवंदना देऊ नये’, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. तशा सूचना मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत. असाच निर्णय मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनीही घेतला आहे.
कारागृहात ई-मुलाखत
बुलढाणा – वर्षानुवर्षे कारागृहात असणार्या बंदीवानांना त्यांच्या कुटुंबाशी ‘ई-संवाद’ साधता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिला ‘ई मुलाखत’ असे म्हणण्यात येत आहे.
८१ व्यसनींवर कारवाई !
कल्याण – येथील पोलिसांनी रात्री झाडे, झुडपे, खाडी किनारा भागात गांजा, मद्य सेवन, काही गैरप्रकार करणार्या ८१ जणांना कह्यात घेण्यात आले. त्यांना आहे त्याच ठिकाणी १०० उठाबशा काढायला लावून पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.
पुणे-मुंबई प्रवासातील अर्धा घंटा वाचणार !
मुंबई – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे पुणे-मुंबई या प्रवासातील अर्धा घंटा वाचणार आहे, तर पुण्यापासून नवी मुंबई विमानतळावर जाण्याचा वेळ २ घंटे इतका अल्प झाला आहे. लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद़्घाटन होणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी हा प्रवास अल्प वेळेत करणे शक्य होईल.
७४ वर्षीय महिलेला ‘डिजिटल’ अटक !
प्राप्तीकर विभागातून सेवानिवृत्त झालेल्या ७४ वर्षीय महिलेला ‘डिजिटल’ अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील २५ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण केलेे.
पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या !
कराड, ३ जानेवारी (वार्ता.) – येथील विंग गावामध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीस कह्यात घेतले आहे. मयुरी मयूर कणसे असे मृत महिलेचे नाव आहे.
नवी मुंबईत गोळीबार !
सानपाडा (नवी मुंबई) – येथे रेल्वेस्थानकाच्या जवळच्या डी-मार्ट परिसरात गोळीबार करण्यात आला. यात १ जण घायाळ झाला आहे. २ आरोपींनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केला. या प्रकरणी अधिक अन्वेषण करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका : असुरक्षित नवी मुंबई !