९०० कोटी रुपयांचा सायबर गुन्हे सुरक्षा प्रकल्प लवकर चालू करणार – गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – राज्यात ९०० कोटी रुपयांचा सायबर गुन्हे सुरक्षा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकर चालू करून या माध्यमातून सायबर गुन्हे थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

देशमुख पुढे म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाने जग व्यापले असतांना ऑनलाइन माहितीची देवाण घेवाण, आर्थिक व्यवहार होतात. अनेक जिल्ह्यांत आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक होतांना दिसते. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. त्यांचे प्रमाण इतर गुन्ह्यांएवढे वाढत आहे. पाच ट्रिलियन डॉलरने सायबर गुन्हे जगभरात वाढत आहेत. महाराष्ट्रातही हे प्रमाण आणि प्रकार वाढत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी आणखी सायबर पोलीस ठाणी चालू करण्यात येणार आहेत.

समाज माध्यमाचा वापर करून पोलीस, राजकीय व्यक्ती, महिला यांची अपकीर्ती  करणे, अफवा पसरवणे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे दिसते. अशा घटना थांबवण्यासाठीही या पोलीस ठाण्यांचा उपयोग होईल. खोटे प्रोफाइल सिद्ध करण्याचे प्रमाणही वाढले आहे, त्याकडे लक्ष देता येईल, असे देशमुख यांनी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गेल्या वर्षी २ सहस्र ५०० सायबर गुन्हे आणि १० सहस्र तक्रारीची नोंद झाल्याची माहिती दिली.