बीड येथे जागो सरकार जागोच्या घोषणा देत ब्राह्मण समाजाचे शासनाला स्मरणपत्र

बीड – दुर्लक्ष केल्या जात असणार्‍या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी येथे २१ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ब्राह्मण समाजाने रस्त्यावर उतरत जागो सरकार जागोच्या घोषणा देत जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरणपत्र दिले. या वेळी ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक प्रमोद पुरसेकर, नगरसेवक राजेंद्र काळे, अखिल भारत ब्राह्मण महासंघाचे चद्रकांत जोशी यांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

१. ब्राह्मण समाजाच्या उन्नत्तीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून १ सहस्र कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापन करण्यात यावे, पुरोहितांना मानधन चालू करावे, कुळात गेलेल्या भूमी त्यांना परत कराव्यात, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे यांसह अन्य विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा चालू आहे.

२. ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत आहेत. ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात १ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत पळी-ताम्हण वाजवून सरकारला स्मरण करून देण्यासाठी जागो सरकार जागोच्या घोषणा देण्यात आला.