आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक !

३ जण कह्यात, ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (पुणे) – अधिकोषामध्ये बनावट खाती उघडून त्याची माहिती चीन, नेपाळ येथील सायबर फसवणूक करणार्‍यांना देऊन ऑनलाईन फसवणूक करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश बाकलीकर उपाख्य कॉम किंग, आदाब शेख आणि सतीश मोरे यांना अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सांगवी येथील एका व्यक्तीला ‘ट्रेडिंग’द्वारे ‘शेअर मार्केट’मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्के नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवले. त्यातून ६१ लाख ३० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली होती.

१. तांत्रिक अन्वेषणातून अधिकोषातील खाते बाकलीकर आणि मोरे यांच्या सांगण्यावरून काढण्यात आले होते.

२. बाकलीकर हा छत्रपती संभाजीनगर परिसरात वेगवेगळ्या अधिकोषांमध्ये बनावट खाती काढून त्याची माहिती चीन, नेपाळमधील सायबर गुन्हेगारांना देत होता.

३. आंतरराष्ट्रीय सायबर आरोपींची बैठक काठमांडू, नेपाळ येथे घेत असल्याची माहिती अन्वेषणातून समोर आली आहे.

संपादकीय भूमिका :

पिंपरी-चिंचवड येथे आंतरराष्ट्रीय सायबर टोळी कार्यरत असणे, हे महाराष्ट्रासह देशासाठी धोकादायक !