नवी मुंबई – १६ जानेवारीला देशभरात पहिल्या टप्प्यात कोरोनाचे लसीकरण पार पडले. ही लस घेतल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ११ जणांना किरकोळ दुष्परिणाम जाणवू लागले आहेत, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी यांनी दिली. हे स्वाभाविक असल्याने यामध्ये काही घाबरण्यासारखे नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात २०० आरोग्य कर्मचार्यांना ‘कोव्हिशील्ड’ लस देण्यात आली. यामध्ये नोंदणी झालेले आणि नोंदणी नसलेल्या कर्मचार्यांनाही लस देण्यात आली. यात एका महिलेला अधिक त्रास जाणवू लागला, त्यामुळे तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. ही लस घेतल्यानंतर उलटी, मळमळ, ताप, जुलाब या प्रकारचा त्रास होत आहे. हे दुष्परिणाम सौम्य प्रकारचे असल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.