गांजाचा अंश असणार्‍या औषधांद्वारे कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवता येतील ! – कॅनडातील संशोधकांचा दावा

नवी देहली – कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठाने गांजाचा वापर करून कोरोनाचा सर्वाधिक धोका असणार्‍या वयोगटातील आणि गंभीर आजार असणार्‍यांना वाचवता येऊ शकते, असा दावा केला आहे. या संशोधनानुसार शरिरामधील रोगप्रतिकार शक्ती आणखी सक्षम करण्यासाठी गांजाचे सेवन करणे लाभदायक ठरते. कोरोना, तसेच इतर गंभीर आजार असणार्‍या व्यक्तींवर गांजाचा अंश असणार्‍या औषधांचा वापर करण्यास प्रारंभ करता येईल, असेही या अभ्यासात म्हटले आहे.

या विद्यापिठामधील संशोधकांच्या एका गटाने दावा केला आहे की, मानवी शरिरामधील रोगप्रतिकार शक्ती अल्प झाल्याने शरिरामध्ये ‘साइटोकाइन स्टार्म’ नावाची प्रक्रिया प्रारंभ होते. यामुळे शरिरामधील निरोगी पेशींवरही परिणाम होतो. कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि इतर आजार असलेल्या अनेक रुग्णांचा याच कारणामुळे मृत्यू झाला आहे.

गांजाच्या पानांमध्ये आढळणारे तत्त्व या साइटोकाइन स्टार्मला थांबवू शकते. साइटोकाइन स्टार्म निर्माण होण्यासाठी इंटरलुकीन-६ आणि ट्युमर नेसरोसीस फॅक्टर अल्फा ही दोन रसायने कारणीभूत असतात. याच रसायनांचे प्रमाण गांजामधील तत्त्वाच्या साहाय्याने न्यून करता येते.