Indias Beauty From Orbit : अंतराळातून भारत दिव्यांचे जाळे पसरल्यासारखा दिसतो ! – सुनीता विल्यम्स

  • सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून आल्यानंतर दिली माहिती

  • भारत भेटीवर येण्याचे केले सुतोवाच !

सुनीता विल्यम्स

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स ९ मास अंतराळात राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वीच पृथ्वीवर परतल्या. त्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी त्यानां भारताशी संबंधित प्रश्न विचारले. ‘भारत अंतराळातून कसा दिसतो ?’ या प्रश्नावर सुनीता म्हणाल्या की, भारत हा एक महान देश आहे. तो दिव्यांचे जाळे पसरल्यासारखा दिसतो. गुजरात, महाराष्ट्र, सर्व लहान-मोठी शहरे आणि समुद्र… हे अद्भुत आहे.

१. सुनीत विल्यम्स पुढे म्हणाल्या की, भारत एका लाटेसारखा आहे. ती लाट भारतात खालच्या दिशेने वहाते. ती अनेक रंगांमध्ये दिसून येते. मला वाटते, जेव्हा तुम्ही पूर्वेकडून गुजरात आणि मुंबईकडे याल तेव्हा तिथल्या किनार्‍यावरील मासेमारी करणार्‍यांचा ताफा तुम्हाला ‘आपण इथे आलो आहोत’, याची थोडीशी सूचना देतो. मग मला संपूर्ण भारतात असा आभास झाला की, ते मोठ्या शहरांपासून लहान शहरांमध्ये जाणार्‍या दिव्यांच्या जाळ्यासारखे आहे. रात्री आणि दिवस दोन्ही वेळी ते पहाणे अविश्वसनीय आहे.

२. पत्रकार परिषदेत सुनीता यांनी त्यांच्या संभाव्य भारत भेटीबद्दलही सांगितले. त्या म्हणाल्या की, मला आशा आहे की, मी माझ्या वडिलांच्या देशात जाईन. तिथे मी ‘ॲक्सिओम मिशन’वर (अंतराळ स्थानकावर अंतराळविरांना पाठवणारी मोहीम. यात एका भारतियाचाही समावेश आहे.) जाणार्‍या भारतीय नागरिकालाही भेटेन. मी त्याला कधीतरी नक्कीच भेटेन. आम्ही आमचे अनुभव एकमेकांना सांगू. भारत हा एक महान देश आहे. तिथे एक अद्भुत लोकशाही आहे, ज्याने अवकाश जगात पाय रोवले आहेत. आम्ही याचा भाग होण्यास आणि त्यांना साहाय्य करण्यास मागेपुढे पहाणार नाही. इस्रोलाही आम्ही साहाय्य करू.