कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने १६ जानेवारी या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४० वा राज्याभिषेकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील स्मारक परिसरामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीमागील जुना भगवा ध्वज बदलून तेथे नवीन ध्वज फडकावण्यात आला. महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचI जयघोष करून झाल्यानंतर आधुनिक पद्धतीने बनवलेल्या एका लहानशा तोफेस बत्ती देऊन सलामी देण्यात आली.
उपस्थित सर्व शिवभक्तांना साखर-पेढ्यांचे वाटप करून तोंड गोड करण्यात आले आणि आनंद साजरा करण्यात आला. या वेळी शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. साताप्पा कडव, उपाध्यक्ष श्री. योगेश रोकडे, सौ. मेघाताई कुलकर्णी, सर्वश्री प्रशांत जाधव, प्रफुल्ल भालेकर, संदीप पाडळकर, नीलेश पिसाळ, तुकाराम खराडे, सुशांत शिंदे, आदीसह असंख्य शिवशंभोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.