विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांनाही परीक्षेस बसण्याची मुभा !
नवी देहली – गायीचे दूध, गोमूत्र, शेण आदी गोष्टी मानवाला अत्यंत उपयुक्त आहेत; मात्र गायीचे कित्येक उपयोग आपल्याला आजही ठाऊक नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता ‘राष्ट्रीय कामधेनू आयोगा’कडून राष्ट्रीय पातळीवर एक परीक्षा घेतली जाणार आहे. गाय आणि तिच्यापासून निर्माण करण्यात येणार्या उत्पादनांमागे असलेल्या विज्ञानाची सर्वांना माहिती व्हावी, हा यामगचा उद्देश आहे. प्रतिवर्षी ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेत यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांना योग्य बक्षिस आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.
१. कामधेनू आयोगाने सांगितल्याप्रमाणे ही ‘गो विज्ञान’ परीक्षा प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांचे विद्यार्थी, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी देऊ शकतात. सामान्य नागरिकही या परीक्षेला पात्र आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क नसणार आहे. या परीक्षेचे नाव ‘कामधेनू गौ विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा’ असे आहे.
२. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष कथीरिया यांनी सांगितले की, नागरिकांच्या मनात गायीविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. या परीक्षामुळे लोकांच्या मनात गायीविषयी उत्सुकता निर्माण होईल. ‘गायीने दूध देणे जरी बंद केले, तरी गाय हा अत्यंत उपयुक्त पशू आहे’, अशी आणि अन्य माहीत नसलेली माहिती लोकांना या परीक्षेमुळे होईल.