पालिका अधिकार्यांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याचे प्रकरण
सोलापूर – येथील महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यात आली. बेकायदेशीर कामांसाठी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना शिवीगाळ करणे आणि उपायुक्त धनराज पांडे यांना ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता. गुन्हा नोंद झाल्यापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. २९ डिसेंबर या दिवशी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बझार पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली होती.
उपमहापौर काळे हे आपल्या संवैधानिक पदाचा अपलाभ घेत अवैध कामे करण्यासाठी पालिका प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करत असून अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा नोंद करून स्थानांतर करण्याची धमकी देत असल्याचे उपायुक्त पांडे यांनी तक्रारीत म्हटले होेते. यापूर्वीही काळे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.