सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांची कन्या कु. वैदेही शिंदे हिला वाढदिवसाच्या दिवशी लिहिलेले पत्र

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची कन्या कु. वैदेही शिंदे रामनाथी आश्रमात सेवेसाठी असते. या वर्षी ८.१२.२०२० या दिवशी तिचा तिथीनुसार (कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी) वाढदिवस होता. त्यानिमित्त सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी कु. वैदेहीला लिहिलेले पत्र येथे दिले आहे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

प्रिय वैदेही हिस,
अनेक आशीर्वाद,

कु. वैदेही शिंदे

१. आजच्या वाढदिवसानिमित्त ‘पत्ररूपाने संवाद साधूया’, असे वाटल्याने तुला पत्र लिहित आहे.

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ‘उच्च स्वर्गलोकातील बालिका’ म्हणून तू आमच्या पोटी जन्माला आलीस, हे आमचे परम भाग्य !

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ऐहिक शिक्षणाचा त्याग करून तुला साधना करण्याची बुद्धी झाली आहे.

४. कलियुगात जीवन जगतांना अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागते; परंतु गुरुदेवांच्या कृपेमुळे तुझा प्रवास अतिशय सुखमय आणि आनंदाच्या स्थितीत चालू आहे.

५. स्पर्धा, संघर्ष यांपासून देवाने तुला दूर ठेवले आहे. आई-बाबाही साधना करत असल्याने तुला साधनेला कोणत्याही प्रकारे विरोध नाही.

६. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे तुझ्यात अनेक गुण जन्मजात आहेत, उदा. नेतृत्व, प्रेमभाव, समष्टीशी जुळवून घेणे, अभ्यासू वृत्ती, तळमळ, मनमोकळेपणा इत्यादी. यांचा लाभ तुला साधना करतांना निश्‍चितच होत आहे.

७. सेवेच्या माध्यमातून तुला दुर्लभ असा संत सहवास आणि संतसेवाही अखंड उपलब्ध होत आहे, यासाठी कृतज्ञताभावात रहाण्याचा प्रयत्न कर.

वरील सर्व अनुकूल परिस्थितीमुळे निश्‍चितच तुझा साधना मार्गावरील प्रवास गतीने होणार आहे, याविषयी मला निश्‍चिती आहे.

८. ‘मनाप्रमाणे व्हावे’, असे वाटणे, अपेक्षा करणे, ‘स्वतःला अधिक कळते’, असे वाटणे, यांसारख्या साधनेच्या वाटेवर गतीरोधकाचे काम करणार्‍या स्वभावदोषांपासून सतत दूर रहाण्याचा प्रयत्न कर. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांंनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवण्याचा प्रयत्न कर. ‘येथे (देवद आश्रमात असतांना) तुझे प्रयत्न थोडे अल्प पडत आहेत’, असे वाटते.

९. ‘समष्टी सेवा जेवढी तळमळीने आणि झोकून देऊन करतेस, तसे प्रयत्न व्यष्टी साधनेच्या विषयांतही करावेस’, असे वाटते. तुझ्याकडून मला अन्य कोणतीही अपेक्षा नाही.

– बाबा, (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.१२.२०२०)