सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पुस्तक बँक’ चालू !

पुस्तके दान करण्याचे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन

पुस्तक बँकेसाठी पुस्तके दान देतांना महापालिका आयुक्त नितीन कापडणीस (डावीकडे) आणि राहुल मुळीक (उजवीकडे)

सांगली – सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वाचनाची मेजवानी देण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाकडून ‘पुस्तक बँक’ चालू केली आहे. या ‘पुस्तक बँके’त नागरिकांनी पुस्तके दान करावीत, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. या अभियानाचा प्रारंभ करत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यांच्याकडील पुस्तके महापालिकेच्या ‘पुस्तक बँके’साठी दिली आहेत. महापालिकेच्या ग्रंथालय विभागाचे राहुल मुळीक यांनी ही पुस्तके स्वीकारली.

महापालिकेच्या वि.स. खांडेकर वाचनालयासमवेत अन्य वाचनालयाचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्यामुळे या वाचनालयामध्ये वाचकांना पुस्तकांचा खजिना उपलब्ध व्हावा, या उद्देशाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ आणि ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने पुस्तक दान हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यांना महापालिकेच्या ‘पुस्तक बँके’त स्वत:ची पुस्तके दान करायची आहेत. त्यांनी महापालिकेच्या वि.स. खांडेकर वाचनालयात असणार्‍या वाचनालय विभागाशी संपर्क साधून जमा करावीत जेणेकरून आपण दान केलेल्या पुस्तकाचा उपयोग वाचकांना होईल, असे आवाहनही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे