नवीन पालिका वटहुकूमाला अखिल गोवा व्यापारी संघटनेचा विरोध : ७ जानेवारीला दुकाने ‘बंद’ ठेवण्याची हाक

 

म्हापसा, ३ जानेवारी (वार्ता.) – अखिल गोवा व्यापारी संघटनेच्या म्हापसा येथील सत्यहिरा सभागृहात ३ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत ‘गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश २०२०’ या शासनाने काढलेल्या वटहुकूमाला विरोध दर्शवला आहे. या वटहुकूमाच्या विरोधात अखिल गोवा व्यापारी संघटनेने ७ जानेवारी या दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा आणि याच दिवशी पणजी येथील आझाद मैदान येथे या विषयाला अनुसरून जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

अखिल गोवा व्यापारी संघटनेच्या मते, हा नवीन वटहुकूम गोव्यातील पालिकेच्या मालकीच्या दुकानमालकांना जाचक ठरणारा आहे. हा वटहुकूम दुकानमालकांच्या हिताच्या विरोधात आहे. या वटहुकूमामुळे पालिका क्षेत्रातील पालिकांच्या अधिपत्याखाली येणार्‍या दुकानांसंबंधी सरकारला प्रमाणाबाहेर अधिकार प्राप्त झालेले आहेत. विद्यमान भाडेकरूंना कोणतीही हानीभरपाई न देता पालिकेच्या मालकीची दुकाने आणि व्यावसायिक ठिकाणे यांना टाळे ठोकणे (सीलबंद), कह्यात घेणे आणि वेळप्रसंगी त्यांचा लिलाव करण्याचे अधिकार सरकारला प्राप्त झाले आहेत. वास्तविक पालिकांच्या मालकीच्या वास्तूत ‘भाडेकरू’ या नात्याने सहस्रो गोमंतकीय कुटुंबे अनेक वर्षे पारंपरिक व्यवसाय करत आहेत. सरकारने अचानकपणे आणि अनपेक्षितपणे वटहुकूम काढला आहे. सरकारला व्यापारी वर्गाविषयी सहानुभूती नाही.

या वटहुकूमाला काँग्रेस आदी विरोध पक्षांनीही विरोध दर्शवला आहे.