गुरूंचे कार्य ठरलेले असते, साधकाच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्याला मार्गदर्शन करणारे गुरु भेटतात !

परात्पर गुरु डॉ. आठवले
‘प्राथमिक, माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट असे शिकणार्‍यांचे स्तर असतात, तसेच गुरूंचेही असतात. त्यामुळे त्यांच्या शिकवण्यात भेद असतात. आपल्या स्तरानुसार आपल्याला गुरु भेटतात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. भाविनी कापडिया

‘१४ वर्षांपूर्वी एका प्रसंगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वरील वाक्याचे विश्‍लेषण केले होते. मार्च २००६ मध्ये सत्संगात नियमित येणार्‍या एक साधिका  सत्संग सोडून अन्य एका व्यक्तीकडे साधनेच्या मार्गदर्शनासाठी जाऊ लागल्या. त्याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले. त्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी मला पुढील दृष्टीकोन देऊन ‘गुरूंचे कार्य कसे ठरलेले असते’, हे शिकवले. ‘सनातनच्या सत्संगात साधक येतील किंवा जातील, याचा आपण विचार करायचा नाही. आपण आपली साधना करत पुढे-पुढे जायचे. एखादी व्यक्ती या जन्मात किती आध्यात्मिक प्रगती करणार, हे ठरलेले असते.

या जन्मात ४० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत प्रगती करणार्‍यांना ६० टक्के पातळीचे गुरु भेटतात, या जन्मात ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत प्रगती करणार्‍यांना ८० टक्के पातळीचे गुरु भेटतात आणि जे या जन्मात प्रगती करून संत होणार (७० टक्के च्या वर आध्यात्मिक पातळी गाठणार), ते इथे (सनातन संस्थेत) येतात.’

परात्पर गुरु हे ९५ टक्क्यांच्या अधिक आध्यात्मिक पातळीचे असून त्यांचे एक कार्य ‘संत घडवणे’ हे असते; म्हणून सनातनमध्ये ३ डिसेंबर २०२० पर्यंत ११० साधक संत झाले आहेत आणि १ सहस्र ३५३ साधक संत होण्याच्या मार्गावर आहेत.’

– कु. भाविनी कापडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.