ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याच्या पाश्‍चात्त्य कुप्रथेला भारतभूमीतून हद्दपार करूया !

सिंधुदुर्गातील युवा धर्मप्रेमींसाठीच्या ऑनलाईन व्याख्यानात आवाहन

सिंधुदुर्ग – हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांचे संविधानिक मार्गाने रक्षण करणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे. ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली ३१ डिसेंबर या दिवशी अनेक अपप्रकार घडत आहेत. या कुसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे प्रकार आज वाढत आहेत. तरुण पिढी अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेकडे वळत आहे. देश संकटात असतांना आपण अशी मौज करणे योग्य आहे का ? यासाठी ३१ डिसेंबर या पाश्‍चात्त्य कुप्रथेला भारतभूमीतून हद्दपार करूया आणि हे युवकांचे आद्यकर्तव्य आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांनी ‘ऑनलाईन’ व्याख्यानात केले.

समाजामध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा धर्मप्रेमींसाठी २६ डिसेंबर २०२० या दिवशी ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी श्री. चोडणकर म्हणाले, ‘‘ आजकाल पाश्‍चात्त्य कुसंस्कृतीच्या प्रभावामुळे समाजमनावर चुकीच्या गोष्टींचा प्रभाव पडलेला पहावयास मिळतो. आज शहरी भागासमवेतच गावागावांमधून ३१ डिसेंबरची रात्र मनोरंजन म्हणून साजरी केली जाते. आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन करून व्यसनाधीनतेकडे वळत आहे. त्यामुळे युवकांची कार्यक्षमता, शारीरिक क्षमता, युवकांची मानसिकता यांवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो; म्हणून या कुप्रथांना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी संघटित व्हायला हवे. आपला धर्म आणि संस्कृती जाणून घेऊन आपले नववर्ष सर्वांनी गुढीपाडव्यालाच साजरे करा.’’

उपस्थितांनी ३१ डिसेंबर आणि गुढीपाडवा यांतील अनुभवलेला भेद !

व्याख्यानाच्या प्रारंभी उपस्थित सर्व धर्मप्रेमींना डोळे बंद करून ‘नववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबरला निर्माण होणारे दृश्य डोळ्यांसमोर आल्यावर काय जाणवते ?’ आणि ‘गुढीपाडव्याचे दृश्य डोळ्यांसमोर आल्यावर काय जाणवते ?’,  हे अनुभवण्यास सांगण्यात आले होते.

त्यानुसार प्रयोग केल्यानंतर ३१ डिसेंबरचे दृश्य डोळ्यांसमोर आणल्यावर ‘रज-तमाचे वातावरण जाणवणे’, ‘त्रास वाढल्याचे जाणवणे’, ‘मन अस्थिर होणे’, असे जाणवल्याचे काहींनी सांगितले, तर याउलट हिंदु नववर्षाला गुढीपाडव्याचे दृश्य समोर आल्यावर ‘वातावरण पुष्कळ चांगले वाटले’, ‘चैतन्य जाणवले’, ‘संतांचा कार्यक्रम असल्यासारखे वाटले’, असे सहभागींनी सांगितले.

व्याख्यानाचा लाभ ८५ युवा धर्मप्रेमींनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नयन पांगम, कु. मानसी जुवलेकर यांनी केले.

धर्मप्रेमींचे अभिप्राय

डॉ. तृषाली पवार – पाश्‍चात्त्य विकृतीला समाजातील लोक कसे बळी पडतात, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. मी शिक्षणासाठी मुंबईला वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल कॉलेजमध्ये) जात होते. तेथेही ३१ डिसेंबर साजरा केला जातो. अशा मौजमजा करण्याच्या धुंदीमुळे एका आधुनिक वैद्यांचा अपघात झाला. त्यांची शैक्षणिक हानी झाली. हे सर्व मी स्वतः पाहिले. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घातला पाहिजे.

कु. अक्षता मोरे – आजची युवा पिढी ही समोरचा कसा वागतो, ते पाहून स्वतः वागण्याचा प्रयत्न करते. आपल्यासाठी समोरचा कसा वागतो, हे महत्त्वाचे नाही, तर मी काय करायला पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. सर्वांपर्यंत हा विषय पोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार.

नववर्षाच्या शुभेच्छा १ जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्यालाच देण्याचा निर्धार !

या व्याख्यानातील मार्गदर्शन ऐकल्यावर सहभागी युवा धर्मप्रेमींनी ‘नववर्षाच्या शुभेच्छा १ जानेवारीला न देता गुढीपाडव्यालाच देणार’, असा निर्धार केला आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणा ‘चॅट बॉक्स’मध्ये लिहून प्रतिसाद दर्शवला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी युवा धर्मप्रेमींनी धर्मकार्यासाठी नियमित १ घंटा वेळ देण्याचा निर्धार केला.