आत्महत्येसाठी अनुमती देत नसाल, तर नक्षलवादी होईन !

शैक्षणिक कर्ज नाकारल्याने बुलढाणा येथील विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

इतकी टोकाची भूमिका घेण्याची वेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर का येते ?

(उजवीकडे) वैभव मानखैर

बुलढाणा – शैक्षणिक कर्ज देऊ शकत नसाल, तर आत्महत्या करायची अनुमती द्या. आत्महत्येस अनुमती देत नसाल, तर मी एक वर्षात उत्कृष्ट नक्षलवादी होऊन दाखवीन आणि अशा बनावट ‘सिस्टम’चे कंबरडे माझ्या पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न करीन, अशी माहिती असलेले पत्र येथील आदिवासी भागातील संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावात रहाणारा फार्मसीचा विद्यार्थी वैभव बाबाराव मानखैर याने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

वडिलांनी शेतीसाठी घेतलेले पीककर्ज न फेडल्याने शिक्षणासाठी धडपडणार्‍या वैभव याला अधिकोषांनी कर्ज नाकारले. पैशांअभावी शिक्षण थांबल्याने निराश होऊन त्याने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची अनुमती मागितली आहे.