उत्साही, स्वावलंबी आणि वयाच्या ८० व्या वर्षीही स्वतःमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करणार्‍या श्रीमती सुलभा मालखरेआजी !

उत्साही, स्वावलंबी आणि वयाच्या ८० व्या वर्षीही स्वतःमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करणार्‍या देवद आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या श्रीमती सुलभा मालखरेआजी !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकदशी, म्हणजेच मोक्षदा एकदशी (गीता जयंती)(२५.१२.२०२०) या दिवशी श्रीमती सुलभा मालखरेआजी यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने देवद आश्रमातील संत आणि त्यांच्या सहवासातील साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘अनेक घरी आजी असतात. त्या कुटुंबियांबरोबर रहात असतात.  असे असले, तरी बहुतेक घरी  काही ना काही कटकटी असतात. याउलट श्रीमती सुलभा मालखरेआजी यांच्या संदर्भातील देवद आश्रमातील पू. (सौ.) अश्‍विनी पवार आणि  साधिकांनी लिहिलेला हा लेख वाचला की, मालखरेआजी किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. आजींची पातळी ६६ टक्के आहे. त्यांची पुढील प्रगती जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
श्रीमती सुलभा मालखरेआजी

श्रीमती सुलभा मालखरेआजी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शिरसाष्टांग नमस्कार !

१. (पू.) सौ. अश्‍विनी पवार

१ अ. प्रामाणिकपणा : ‘श्रीमती मालखरेआजी लहानपणापासून प्रामाणिक आहेत. त्या त्यांच्या बालपणाचे आणि तरुणपणाचे प्रसंग सांगतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून ‘आजी कधी कुणाशी खोटे बोलल्या नाहीत आणि त्यांना कधी कुणाची फसवणूक झालेली आवडत नाही’, असे लक्षात येते.

१ आ. धीरोदात्त आणि खंबीरपणा असणे : आजींचे पूर्वायुष्य पुष्कळ खडतर गेले आहे. त्यांना जीवनात अत्यंत कठीण अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. त्या सर्व प्रसंगांना आजी धीरोदात्तपणे सामोरे गेल्या. त्यांचे मन पुष्कळ खंबीर आहे. ‘जीवनातील अनेक कठीण प्रसंगात गुरूंनी कसे बळ दिले’, ते त्या कृतज्ञतेने सांगतात.

१ इ. तत्परतेने चुका स्वीकारणे : एकदा मी आजींना एका साधिकेच्या संदर्भात त्यांच्याकडून झालेली चूक सांगितली. तेव्हा आजींनी ती लगेचच स्वीकारली. आपली चूक ऐकतांना आजींना त्याची पुष्कळ खंत वाटत होती. त्यानंतर आजी म्हणाल्या, ‘‘माझे चुकले गं ! आता मी पालट करते.’’ त्या बोलत असतांना त्यांच्यात पुष्कळ अंतर्मुखता होती. आजींनी त्यांच्या चुकीवर कोणतेच समर्थन केले नाही. चूक ऐकल्यावर त्यांनी त्या साधिकेची क्षमा मागितली.

आजींनी दुसर्‍या दिवसापासून स्वतःमध्ये पालट करायला प्रारंभ केला. ‘या वयातही इतकी खंत वाटून इतका पालट होऊ शकतो’, याचे मला पुष्कळ कौतुक वाटले. ‘आजींनी स्वतःमध्ये पुष्कळ पालट केला आहे’, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

१ ई. आज्ञापालन करणे : त्यांच्या भूतकाळातील प्रारब्धाच्या घटना आठवून त्यांना त्रास होत असे. त्या घटना त्यांनी मला सांगितल्या होत्या. भूतकाळातील विचार आठवून त्या त्याच विचारात रहात होत्या. त्या वेळी मी आजींना म्हणाले, ‘‘तुम्ही आता साधनेत पुढे चालल्या आहात, तर जुन्या मायेतील गोष्टींत अडकून साधनेचा वेळ जाऊ देऊ नका.’’ असे मी त्यांना केवळ २ ते ३ वेळा सांगितले असेल. तेव्हापासून आजींचे भूतकाळात अडकणे न्यून झाले आहे.

१ उ. स्वतःला पालटण्याची आणि साधनेची तीव्र तळमळ असणे : काही दिवसांनी भेटून आजी मला विचारतात, ‘‘मी साधनेसाठी काय प्रयत्न करू ?’’ त्यांच्याशी झालेल्या प्रत्येक भेटीत त्या आतापर्यंत काय प्रयत्न करतात, ते सांगतात आणि विचारतात, ‘‘त्यात काही पालट करायला पाहिजे का ?’’ त्या सांगितलेल्या प्रयत्नांनुसार कृती करायला आरंभ करतात. ‘एखाद्या प्रसंगात साधना म्हणून कसे वागायला हवे ?’, हेही त्या विचारतात.

१ ऊ. साधकत्व असणे : आजींच्या पूर्वायुष्यात त्यांनी अनेक मोठे मोठे व्यवहार केले आहेत. त्यांनी अनेक मोठे निर्णयही घेतले आहेत; पण आश्रमाशी जोडल्यापासून त्या प्रत्येक लहान-सहान कृतीही विचारून करतात. ‘या वयातही आजींमधील साधकत्वामुळे विचारण्याची वृत्ती निर्माण होऊ शकते’, असे वाटले.

आजींमधील साधकत्व, साधनेची तळमळ आणि गुरूंप्रतीचा भाव यांमुळे तरुण साधकांना जमणार नाहीत, असे पालट त्या ८० व्या वर्षीही स्वतःमध्ये करत आहेत आणि साधनेत पुढे पुढे जात आहेत. अशा सोन्यासारख्या आजी दिल्याविषयी आम्ही भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहोत.’

२. वैद्या (कु.) माया पाटील

२ अ. नीटनेटकेपणा : श्रीमती मालखरेआजी अतिशय व्यवस्थित आणि नीटनेटक्या रहातात. या वयातही त्या सुती साड्या नेसतात. साडी धुतल्यावर चुरगळते. ‘साडीला इस्त्री करण्यात वेळ जायला नको आणि साडी चुरगळलेलीही दिसायला नको’, यासाठी त्या साडीची व्यवस्थित घडी घालून झोपण्यापूर्वी साडी गादीखाली ठेवून झोपतात. त्यामुळे वेळही वाचतो आणि साडीही व्यवस्थित होते.

२ आ. मनमोकळेपणा : त्यांना काहीही त्रास झाला, तरी त्या मोकळेपणाने सांगतात. मनामध्ये आलेला कुठलाही विचार त्या मनामध्ये ठेवत नाहीत. एखाद्या साधिकेने सेवेमध्ये चूक केली असली, तरी तीही त्या मोकळेपणाने सांगतात. त्यांच्या मनात ‘स्वतःविषयीची चूक कशी सांगू ?’ असा विचार येत नाही. ‘गुरुदेवांना चुका केलेल्या आवडत नाहीत’, तर ‘आपल्या लक्षात आलेल्या चुका सांगायला हव्यात’, असा दृष्टीकोन ठेवून त्या मोकळेपणाने चुका सांगतात.

२ इ. स्वावलंबी : आजींना वाताचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना कंबरदुखी आहे. त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रासही आहे. त्यामुळे त्यांना अनेकदा बस्ती घ्यावी लागते. त्यासाठी नेहमी ‘कुणी साधक उपलब्ध असतोच’, असे नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच ते शिकून घेतले आहे. त्यांना त्रास व्हायला लागल्यावर त्या स्वतःच काढा सिद्ध करून बस्ती घेतात.

२ ई. स्वतःचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी वयाच्या ५६ व्या वर्षी पोहायला शिकणे : वयाच्या ८० व्या वर्षीही त्या त्यांच्या प्रकृतीची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेतात. आहाराच्या वेळा, पथ्य आणि विश्रांती या सर्व गोष्टी त्या व्यवस्थित पाळतात. त्यामध्ये त्या सवलत घेत नाहीत. आरोग्य चांगले रहाण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यातील एक प्रयोग म्हणजे वयाच्या ५६ व्या वर्षी त्या पोहायला शिकल्या. त्या वेळी त्यांना उष्णतेचा त्रास होत होता आणि कंबर अन् पाठदुखीही होती. त्या वेळी ‘आपण पाण्यात राहिल्यास आपल्या शरिरातील उष्णता अल्प होईल आणि कंबर अन् पाठदुखीचा त्रासही न्यून होईल’, असा विचार करून त्या पोहायला शिकल्या. पोहायला यायला लागल्यावर त्यांचे वरील दोन्ही त्रास न्यून झाले.

२ उ. आयुर्वेदावर प्रेम : आजींना कोणताही शारीरिक त्रास झाल्यास त्या आयुर्वेदीय औषधाला प्रथम प्राधान्य देतात. लहानपणापासून त्यांनी आयुर्वेदीय औषधेच घेतली आहेत आणि त्यांना अनेक औषधे ठाऊकही आहेत. त्यांची आयुर्वेदीय औषधांवर श्रद्धा आहे.

३. कु. सोनाली गायकवाड

३ अ. पुष्कळ कृतज्ञताभाव असणे : ‘आजींमध्ये कृतज्ञताभाव पुष्कळ आहे. एकदा आजींना जेवण जात नसल्याने त्यांना लाडू द्यायचे होते; परंतु मला त्यांना लाडू नेऊन देणे शक्य नव्हते. त्यामुळे मी सहसाधिकेकडून ते त्यांच्याकडे पाठवले. ते लाडू पाहिल्यावर त्या मला भ्रमणभाष करून म्हणाल्या, ‘‘देव माझ्यासाठी किती करतो, त्यासाठी कृतज्ञता !’’ त्या वेळी त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू येत होते.

३ आ. वस्तू आणि पैसे काटकसरीने वापरणे अन् त्याबद्दलचा भाव : आजींचा स्वभाव अतिशय काटकसरी आहे. त्यांच्याकडे एखादी वस्तू अतिरिक्त असली, तरी त्या वस्तूचा वापर काटकसरीने करतात. ‘ती वस्तू देवाची आहे आणि देवाने मला सांभाळायला दिली आहे’, असा त्यांचा भाव असतो. पैशांच्या संदर्भात आजी म्हणतात, ‘‘माझ्याकडे पैसे आहेत, ते देवाचेच आहेत. देवाने केवळ या जन्मामध्ये ते मला सांभाळायला दिले आहेत. माझ्याकडे ते आहेत; म्हणून त्याचा कसाही आणि कुठेही वापर करायचा नाही.’’ त्यामुळे त्या आवश्यक गोष्टीच विकत घेतात.

३ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी आश्रमात रहायला सुचवल्यावर संपूर्ण श्रद्धेने स्वीकारणे : आरंभी आजींना वाटत होते की, ‘मी आश्रमात राहू शकणार नाही. आश्रमजीवनाशी जुळवून घेणे कठीण आहे.’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनी त्यांना आश्रमात रहायला सुचवल्यावर त्यांनी संपूर्ण श्रद्धेने ते स्वीकारले. याविषयी आजी म्हणाल्या, ‘‘त्या साक्षात् देवीच आहेत. त्यांनी बोललेले मी कसे ऐकणार नाही ? त्यांच्यामुळेच मी आश्रमात राहू शकले.’’

३ ई. राष्ट्राभिमान असणे : चीन, पाकिस्तान यांच्या आक्रमणाच्या काही बातम्या असतील, तर आजींना त्यांच्याविषयी पुष्कळ चीड येते. आजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पाहिले आहे. आजींनी एकदा सांगितले, ‘‘माझी सावरकरांच्या वडिलांची ओळख होती.’’

३ उ. हिंदु राष्ट्र पहाण्यासाठी जगण्याची इच्छा असणे : आजींना ‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, याविषयी फार उत्सुकता आहे. एकदा आजी मला म्हणाल्या, ‘‘मला हिंदु राष्ट्र पहायचे आहे गं ! मी जगेन ना तोपर्यंत ? हिंदु राष्ट्र पहाण्यासाठी मला जगायचे आहे.’’ त्यांची ती तळमळ इतकी होती की, त्या हे सांगत असतांना रडत होत्या.’

४. सौ. वेदांती बडगुजर

४ अ. उत्तम व्यवहार ज्ञान असणे आणि ‘त्याचा साधकांना लाभ व्हावा’, या उद्देशाने एखादा प्रसंग सांगणे : ‘आजींना व्यवहाराचे उत्तम ज्ञान आहे. त्या साधकांशी बोलतांना व्यवहारातील एखादा प्रसंग सांगतात. त्यातून ‘त्या साधकाला काहीतरी लाभ व्हावा’, असा त्यांचा उद्देश असतो. त्या ‘त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समष्टीला कशा प्रकारे होईल ?’, याचा अभ्यास करून बोलतात.

४ आ. प्रेमभाव वाढवणे : ‘मी श्रीमती मालखरेआजींच्या सेवेत आले. त्या वेळी ‘आजी पुष्कळ कडक शिस्तीच्या आहेत’, असे मला वाटायचे. पूर्वी त्यांच्या बोलण्यात कठोरता जाणवायची. त्यांना त्याची जाणीव झाल्यावर त्यांनी अगदी अल्प कालावधीत त्यांच्या बोलण्यात पालट केला. त्यामुळे आता आजी पूर्वीपेक्षा अधिक प्रेमाने बोेलण्याचा प्रयत्न करतात.

४ इ. चुकीसाठी क्षमायाचना करणे : त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुकांची जाणीव झाल्यावर त्या लगेचच संबंधित साधकांची क्षमायाचना करतात. त्या वेळी त्यांच्या मनात कुठलाही प्रतिमेचा विचार नसतो. ‘त्या संबंधित साधकांमध्ये गुरुरूप पाहून क्षमायाचना करत आहेत’, असे जाणवते.

५. कु. पल्लवी हेम्बाडे

५ अ. साधिकेला सेवा समजावून देणे आणि त्या चांगल्या प्रकारे केल्यास कौतुक करणे : ‘मी आजींच्या खोलीत रहाते. खोलीची स्वच्छता आणि त्यांच्या काही सेवा मी करते. पहिल्या दिवशी आजींनी मला प्रत्येक सेवा समजावून सांगितली आणि त्यातील बारकावेही चांगल्या प्रकारे सांगितले. त्यामुळे मला खोलीतील सेवा करतांना अडचण आली नाही. सेवा चांगली केल्यावर त्या कौतुकही करतात.

५ आ. सवलत न घेता पहाटे नियमित उठून प्राणायाम करणे : आजींना कधी कधी रात्री उशिरा झोप लागते. एकदा त्या पहाटे ३ वाजता झोपल्या, तरी त्या पहाटे ५ वाजता उठल्या. आजी नेहमी नियमित पहाटे ५ वाजता उठतात. या वयात प्राणायाम आणि सकाळी आश्रमाबाहेर एक फेरी मारतात. प्रत्यक्षात सकाळी त्यांना थकवा असतो; पण त्या कधीच सवलत घेत नाहीत.

५ इ. ऐकण्याची वृत्ती असणे : आजींना बाजारातून काही वस्तू आणायच्या होत्या. त्यांनी आश्रमातील स्वागतकक्षात वस्तूंचे वर्गीकरण न करता लिहून दिल्या होत्या. मी आजींना सांगितले की, ‘वस्तूंचे वर्गीकरण करून दिले तर तेथे सेवा करणार्‍या साधकांना अडचण येत नाही. यापुढे मी तसे करून देईन’. त्या वेळी त्यांनी माझे म्हणणे शांतपणे ऐकले.’

६. श्री. यज्ञेश सावंत

६ अ. व्यवस्थितपणा : ‘श्रीमती मालखरेआजींच्या घरातील वस्तू टापटीप आणि व्यवस्थित ठेवलेल्या असतात. आजींना सर्व वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या आवडतात.

६ आ. स्वतःला शक्य होईल, ते करण्याचा प्रयत्न करणे : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये काही दिवसांआड संगणक अथवा अन्य साहित्य अर्पण देण्याविषयी अथवा त्यासाठी रक्कम देण्याविषयी चौकट येत होती. तशी चौकट आल्यावर त्या ‘‘मला यातील काही कळत नाही. तू पाहून काय हवे असेल, ते मला सांग. पैसे लागले, तर मी देते’’, असे मला सांगत होत्या. यातून आपल्याला जे काही शक्य आहे, ते करत रहाण्याचा त्यांचा प्रयत्न माझ्या लक्षात आला.

६ इ. इतरांचा विचार करणे : एका साधकाच्या अनुपस्थितीत काही दिवस मला त्यांना सकाळी ५.३० वाजता थर्मासमधून दूध नेऊन देण्याची सेवा होती. या वेळेत मी नामजपादी उपाय करत असल्याचे त्यांना समजल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘मला पावणेसहापर्यंत दूध आणले, तरी चालेल.’’
(१९.१२.२०२०)