पणजी, २२ डिसेंबर (वार्ता.) – गोव्यातील बौद्ध धर्मियांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळण्यासाठी कायद्यात आवश्यक पालट करण्याचा निर्णय येथे झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या धोरणांचा अभ्यास केला जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यामध्ये विधानसभा संकुलातील सभागृहात पार पडलेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गोव्यात आंबेडकर भवन बांधण्यासाठी पणजी परिसरात राज्यशासन भूखंड उपलब्ध करून देणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. गोव्यात समाजकल्याण योजना राबवण्यासाठी केंद्रशासन आवश्यक ते साहाय्य करणार असल्याचे ते पुढे म्हणाले.