आता शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्प उभारा !

सत्तरी तालुक्यात मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाल्यानंतर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

पणजी – आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचा पाठिंबा लाभलेले सत्तरी तालुक्यातील होंडा, केरी, नगरगाव आणि उसगाव-गांजे जिल्हा पंचायत मतदारसंघांतील उमेदवार निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, ‘‘जिल्हा पंचायत निवडणुकीच्या वेळी आम्ही लोकांचे मत जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्याची फलनिष्पत्तीही चांगली मिळाली आहे. सत्तरी तालुका आणि शेजारील मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ यांच्या विकासासाठी योग्य आहे ते करण्यासाठी मतदारांनी कौल दिला आहे. भाजपवर लोकांनी विश्‍वास दाखवला आहे. आता शेळ-मेळावली येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभा राहील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जर शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्प उभारायचा आहे, तर त्यांनी त्यासंबंधीची प्रक्रिया त्वरित चालू करावी, असे माझे आवाहन आहे. केवळ २ गावांतील ६०० लोक विरोध करतात, म्हणून हा प्रकल्प थांबवू नये.’’

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. स्थानिक नागरिक संबंधित अधिकार्‍यांना प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाकडे जाण्यापासून रोखून धरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी हे आवाहन केले. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘भाजप सकारात्मक मानसिकता ठेवून लोकांसमोर गेला आणि भाजप लोकांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करेल.’’