‘७.५.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात राजमातंगी यज्ञ झाला. यज्ञाच्या वेळी मी मोठ्या औदुंबराच्या वृक्षाखाली आसंदीवर बसले होते.
१. पूर्णाहुतीचे मंत्र चालू असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘औदुंबर वृक्षाच्या फांदीवर एक ऋषि बसले आहेत. ते पुरोहित साधकांच्या समवेत यज्ञाचे मंत्रपठण करत आहेत.
२. औदुंबर वृक्षाच्या फांद्यांच्या पुढे हाताचा पंजा आहे आणि त्या हाताच्या पंजावर अनेक ऋषी बसले आहेत. ते यज्ञात सहभागी झाले आहेत.
३. रामनाथी आश्रमात यज्ञ चालू आहे. तो आम्हाला दृश्य स्वरूपात दिसत आहे. त्यात स्थुलातील काही मनुष्य जीव सहभागी आहेत. समष्टीसाठी चालणार्या या यज्ञात सूक्ष्मातून देवता, ऋषिमुनी, सिद्ध पुरुष आणि पुण्यात्मे सहभागी झाले आहेत.
४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्यासाठी सूक्ष्मातील साहाय्य मिळाल्यामुळे ईश्वरी कार्य सिद्धीस जात आहे. यज्ञाच्या ठिकाणी चैतन्य जाणवून विविध उच्च स्तरावर आध्यात्मिक अनुभूती येत आहेत.
५. यज्ञातील सूक्ष्मातील दैवी सहकार्यामुळे स्थुलातील परिणाम होतांना दिसत आहेत, उदा. साधकांच्या व्याधी बरे होणे, साधकांचे अपघात टळणे, वाईट शक्तींच्या त्रासापासून रक्षण होणे, धर्मप्रसारातील अडथळे दूर होणे आणि राष्ट्रावरील मोठे संकट टळणे.
६. यज्ञात देवतेला आवाहन आणि याचना केल्याने अन् तिला शरण गेल्यामुळे कार्यात सहभागी असणार्यांना दैवी पाठबळ आणि साहाय्य मिळत आहे. देवतांचे आशीर्वाद मिळत आहेत. त्यामुळे स्थुलातील कार्य सिद्धीस जात आहे.’
– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.५.२०१९)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |