पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पांंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी भूमीपूजन

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पांंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी १० डिसेंबर या दिवशी भूमीपूजन सोहळा पार पडला. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवर उपस्थित होते.

‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे नवीन संसद भवनाच्या उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे. नवीन संसद भवनाची इमारत ४ मजली असणार आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयाने याच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे. या नियोजित संसद भवनात ९०० ते १ सहस्र २०० खासदारांची बैठक व्यवस्था असून हा सुमारे ९७१ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे ८८८ जागा उपलब्ध असतील, तर राज्यसभा सदस्यांसाठी ३२६ पेक्षा अधिक जागा उपलब्ध असतील.