राज्यातील ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी लवकरच आदर्श कार्यप्रणाली ! – अस्लम शेख, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांतील जलक्रीडा व्यावसायिकांनी घेतली मंत्री शेख यांची भेट

मुंबई – राज्यातील जलक्रीडा (Water Sport) चालू करण्याविषयी लवकरच आदर्श कार्यप्रणाली सिद्ध करण्याचे आश्‍वासन महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांतील जलक्रीडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले.

कोरोनाविषयीच्या नियमांत शिथिलता आल्यानंतर पर्यटनासह अनेक व्यवसाय चालू करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे पर्यटक समुद्रकिनारी प्रामुख्याने जलक्रीडा करण्यात स्वारस्य दाखवतात; मात्र यावर प्रारंभी बंदी होती. तरीही काही व्यावसायिकांनी अवैधपणे त्यांचे व्यवसाय चालू केले होते. त्यांच्यावर बंदर विभागाने कारवाई केली. त्यामुळे जलक्रीडा व्यवसाय चालू करण्यासाठी जलक्रीडा व्यावसायिकांनी विविध मार्गांनी प्रयत्न चालवले होते. अखेर जिल्हाधिकार्‍यांनी जलक्रीडा व्यवसाय चालू करण्यास अनुमती दिल्यानंतर जलक्रीडा चालू करण्यात आल्या; मात्र बंदर विभागाने पुन्हा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला. त्यामुळे जलक्रीडा व्यावसायिक आणि बंदर विभाग यांच्यात संघर्ष निर्माण झाला. अखेर जलक्रीडा व्यावसायिकांनी बंदर आणि मत्स्यव्यवसाय मंत्री शेख यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांतील जलक्रीडा व्यावसायिकांनी ७ डिसेंबरला मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन जलक्रीडा चालू करण्याविषयी निवेदन दिले.

या वेळी मंत्री शेख म्हणाले की, महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे. राज्य सरकारचा बंदर विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय वाढावा, यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत.