भाग्यनगर महापालिका त्रिशंकू स्थितीत !

भाजपची ४ वरून ४८ जागांवर मुसंडी

भाग्यनगर (तेलंगाणा) – अत्यंत चुरशीच्या झालेल्या भाग्यनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक ५५ जागा तेलंगाणा राष्ट्र समितीला मिळाल्या आहेत, तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भाजपला ४८ जागा आणि तिसरा क्रमांक मिळालेल्या एम्.आय.एम्. ला ४४ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मागील महापालिकेत भाजपच्या केवळ ४ जागा होत्या. या वेळी राष्ट्रवादाचा प्रसार करून भाजपच्या जागांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळेच ही महापालिका त्रिशंकू स्थितीत गेली आहे. आता कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार? हा गहन प्रश्‍न निर्माण झाला आहे. ‘भाजपला विरोध करण्यासाठी तेलंगाणा राष्ट्र समिती आणि एम्.आय.एम्. एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतील’, असे म्हटले जात आहे.