गोवा फाऊंडेशनसह पर्रा ग्रामस्थांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाची सरकारला नोटीस

म्हापसा, ४ डिसेंबर (वार्ता.) – नगर नियोजन कायद्यांतर्गत नियोजन क्षेत्रात पर्रा गावाचा समावेश करण्याचा निर्णय उत्तर गोवा नगर नियोजन मंडळाने यापूर्वी घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात पर्रा ग्रामस्थ आणि गोवा फाऊंडेशन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी ४ डिसेंबर या दिवशी न्यायालयात प्राथमिक सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने सरकार, पर्रा पंचायत, पंचायत संचालनालय आणि उत्तर गोवा नगर नियोजन मंडळ यांना नोटीस पाठवली. यासंबंधीची पुढील सुनावणी २१ डिसेंबर २०२० या दिवशी होणार आहे. पर्रा गावासाठी अधिसूचित केलेला बाह्यविकास आराखडा रहित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.