न्यायाधीश हे महिला अधिवक्ता आणि कर्मचारी यांचे लैंगिक शोषण करतात, असा आरोप केल्याचे प्रकरण
चेन्नई (तमिळनाडू) – सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांचे काही न्यायाधीश महिला अधिवक्त्यांचा अन् न्यायालयातील महिला कर्मचार्यांचा लैंगिक छळ करतात, असा आरोप केल्याच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी.एम्. कर्णन यांना येथील पोलिसांनी अटक केली. माजी न्यायाधीश कर्णन यांनी एका व्हिडिओमध्ये पीडित महिलांची नावेही सांगितली आहेत. मद्रास उच्च न्यायालयाच्या एका अधिवक्त्याने केलेल्या तक्रारीवरून २७ ऑक्टोबरला चेन्नई पोलिसांच्या सायबर सेलने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. कर्णन हे न्यायाधीश असतांनाही त्यांना एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.
पोलीस अधिकार्यांच्या माहितीनुसार मद्रास उच्च न्यायालयातील काही वरिष्ठ अधिवक्त्यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे कर्णन यांच्याविरोधात एक पत्र लिहिले होते. यामध्ये एका व्हिडिओविषयी सांगण्यात आले होते. यात कर्णन यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधाने केली आहेत. तसेच न्यायिक अधिकार्यांना धमकावले आहे. न्यायाधिशांच्या पत्नींना बलात्काराच्या धमक्या दिल्या आहेत.