‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे शरिरावर गंभीर परिणाम झाल्याने वितरण थांबवण्याची चेन्नईच्या स्वयंसेवकाची मागणी

‘सिरम’ने दावा फेटाळला

पुणे – ‘कोव्हिशिल्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे आरोग्य विषयक गंभीर समस्या उत्पन्न झाल्याने चेन्नईच्या ‘बिझनेस कन्सलटन्ट’ असलेल्या एका ४० वर्षीय स्वयंसेवकाने कोव्हिशिल्ड लसीच्या चाचण्या, उत्पादन आणि वितरण तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे (आय.सी.एम्.आर्.चे) महासंचालक आणि ‘सेंट्रल ड्रग्ज स्टँर्डड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ यांना या स्वयंसेवकाने २१ नोव्हेंबर या दिवशी कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. तसेच त्याने ५ कोटी रुपयांची हानीभरपाईसुद्धा मागितली आहे.


‘सिरम’ इन्स्टिट्यूटने हा दावा फेटाळून लावत ‘नोटिसीमध्ये करण्यात आलेले आरोप हे अत्यंत चुकीचे आणि द्वेषयुक्त असून लस चाचणीचा स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थितीशी कोणताही संबंध नाही. याविरोधात आम्ही त्यांच्या विरोधात हानीभरपाईचा १०० कोटींचा दावा ठोकू शकतो’, असे २९ नोव्हेंबर या दिवशी घोषित केले आहे.