अयोध्येनंतर मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेकडून दीपोत्सव आणि हिंदु धर्मसभा यांचे आयोजन

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

जबलपूर (मध्यप्रदेश) – या देशात बाबरसारख्या आक्रमकाच्या वंशजांनाही न्यायालयामध्ये त्यांचा अधिकार मागण्याची अनुमती आहे, जे अन्य देशांमध्ये नाही. जेव्हा आम्ही आमचे अधिकार मागतो, तेव्हा आम्हाला जातीय म्हटले जाते; परंतु आम्हाला ‘जातीय हिंदु’ असल्याचा गर्व आहे. ज्या प्रकारे हिंदू संघटित होऊन पुढे जात आहेत, ते पहाता आपले लवकरच ‘हिंदु राष्ट्रा’चे स्वप्न पूर्ण होईल, हे स्पष्ट होते. स्वार्थापलीकडे जाऊन समाज आणि धर्म यांसाठी कार्य केले पाहिजे. मीही शेवटच्या श्‍वासापर्यंत हिंदुत्वासाठी कार्य करणार आहे. अयोध्या आपली झाली, आता मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष तथा सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी केले. हिंदु सेवा परिषदेच्या वतीने २१ नोव्हेंबर या दिवशी दीपोत्सव तथा हिंदु धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते मार्गदर्शन करत होते.

‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा काळा कायदा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

श्रीकृष्ण जन्मभूमी खटल्याचे याचिकाकर्ते तथा सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले की, मंदिर-मशीद लढाई राजकीय किंवा वैयक्तिक नाही. भक्त आणि ईश्‍वर यांच्यावर जो अन्याय झाला, त्यासाठी ही लढाई आहे. हिंदु राष्ट्रासाठी आपल्याला स्वत:च्या महत्त्वाकांक्षा जाळून नष्ट केल्या पाहिजेत. श्रीकृष्ण जन्मभूमीसंबंधी आवश्यक सर्व पुरावे उपलब्ध आहेत. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा काळा कायदा आहे. या कायद्यानुसार आपल्याला आक्रमकांनी कह्यात घेतलेल्या मंदिरांच्या विषयावर न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार नाही; पण हा कायदा वक्फ बोर्डाला मात्र पूर्ण मोकळीक देतो. आम्ही कायदा मानणारे आहोत. त्यामुळे आम्ही ‘सीएए’ आंदोलनाप्रमाणे रस्त्यावर उतरणार नाही; परंतु हिंदूंना त्यांच्या भावनांचे रक्षण करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे.

हिंदूंची सर्व मंदिरे मुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – आनंद जाखोटिया, राजस्थान आणि मध्यप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

आनंद जाखोटिया

हिंदु सेवा परिषद आयोजित ही धर्मसभा वास्तविक दीपोत्सव आहे; कारण हा कार्यक्रम हिंदूंमध्ये जागृतीचा दीप प्रज्वलित करणार आहे. हिंदूंना केवळ काशी, मथुरा पर्यंतच नाही, तर जी मंदिरे इस्लामी आक्रमकांनी उद्ध्वस्त करून तेथे त्यांची बांधकामे केली, ती मुक्त करण्याची मोहीम उघडली पाहिजे. यासाठी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’ रहित होणे आवश्यक आहे. एका श्रीराममंदिरासाठी हिंदूंना किती संघर्ष करावा लागला; परंतु आता सर्व मंदिरे लवकर मुक्त करण्यासाठी आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा मुक्तीचा संघर्ष हा मध्यप्रदेशसाठी अयोध्येसारखाच आहे. ज्याप्रकारे योगी सरकारने श्रीराममंदिरासाठी इच्छाशक्ती दाखवली, तशी इच्छाशक्ती गो-कॅबिनेट करण्याचा निर्णय घेणार्‍या मध्यप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्यासाठी आणि धार येथील भोजशाळेच्या मुक्तीसाठी दाखवावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे.

याप्रसंगी महामंडलेश्‍वर डॉ. स्वामी मुकुंददासजी महाराज, आर्य समाजाचे अध्यक्ष आचार्य धीरेंद्र पांडे, उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रमन पटेल, हिंदु सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी आणि श्री. धीरज ज्ञानचंदानी यांनीही सभेला संबोधित केले. हिंदु सेवा परिषदेचे सर्वश्री सौरभ जैन, नितीन सोनपल्ली, बबलू पटवा, उत्कर्ष रावत, अधिवक्ता अक्षय झा, बंटी लालवानी, राजा रजक, संजू पटेल, बृजेश लोधी, अतुल कुशवाहा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रयत्न केले.

या कार्यक्रमामध्ये महामंडलेश्‍वर स्वामी मुकुंददासजी महाराज, पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, आचार्य धीरेंद्र पांडे, उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष रमन पटेल, सचिव मनीष तिवारी, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर नायक, सचिव राजेश तिवारी, अतुल जेसवानी यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२१’चे प्रकाशन करण्यात आले. या वेळी सर्व मान्यवरांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट स्वरूपात देण्यात आले.