श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘अवघे विश्‍वची माझे घर ।’ या संकल्पनेपर्यंत नेण्यास आरंभ करणे

‘सेवेनिमित्त सतत करत असलेल्या गावोगावच्या भ्रमंतीमुळे आता हा मार्गच (रस्ताच) आमचे घर झाला आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला हळूहळू ‘अवघे विश्‍वची माझे घर ।’ या संकल्पनेपर्यंत नेण्यास आरंभ केला आहे. यातूनच आमच्यात एक दिवस ‘विश्‍वव्यापकत्व’ येईल. केवढा मोठा हा आशीर्वाद !

२. (साधनेसाठी करत असलेला) ‘प्रवास’ हेच ‘जीवन’ होणे

एका व्यक्तीने मला विचारले, ‘‘बरेचजण आपला ‘जीवन प्रवास’ लिहितात; परंतु तुमचे मात्र ‘प्रवास जीवन’ असेल.’’ मी म्हटले, ‘‘योग्य आहे. खरंच, आमचा ‘प्रवास’ हेच आमचे ‘जीवन’ झाले आहे.’’

३. देवाशी असलेले भक्ताचे नातेच, त्याला सर्व नात्यांच्या पलीकडे असलेल्या आनंदस्वरूपाकडे घेऊन जाते !

देव हे एक आकर्षण आहे. त्याचा छंद सर्वांनाच लागेल, असे नाही. पुण्यवंतांनाच त्याचे वेड लागते. हे वेड जगावेगळे असते. त्यात सर्व नाती असतात. देवाशी असलेले भक्ताचे नातेच, एक दिवस त्याला सर्व नात्यांच्या पलीकडे असलेल्या त्या आनंदस्वरूपाकडे घेऊन जाते.

४. झोपेतही संत सुंदर दिसण्यामागील कारण !

लहान बाळांचे मन निर्विचार असल्याने झोपेतही बाळ सुंदर दिसते. खरं म्हणजे झोप तमोगुणी आहे. झोपेत माणसाचे शरीर झोपते; परंतु मन मात्र अधिक कार्यरत असते. सतत स्वार्थी विचारांचे वादळ मनात चालू असणारा माणूस झोपल्यानंतर चांगला दिसत नाही; मात्र बाळ छान दिसते; कारण त्याचे मन निर्मळ आणि सुंदर असते. असेच संतांचे आहे. संत बाळासारखे निर्मळ असल्याने वयाने मोठे असणारे संतही झोपल्यानंतर बाळासारखे सुंदर दिसतात.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१९.०४.२०२०)