आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाची (इडीची) धाड !

आमदार प्रताप सरनाईक

ठाणे, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील आमदार आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालय (इडीच्या) पथकाने धाड टाकली आहे, तसेच प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही धाड टाकण्यात आली. या धाडसत्रानंतर त्यांचा मुलगा विहंग याला अंमलबजावणी संचलनालयाने कह्यात घेतले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयाचे (इडी) पथक आले. यानंतर पुढील या अन्वेषण चालू आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण (‘सर्च ऑपरेशन’) करण्यात येत असल्याचे समजते.

कायदेशीर लढाई लढणार ! – प्रताप सरनाईक

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई नेमकी का केली, याची मला माहिती नाही. मी माहिती घेण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणी कायदेशीर लढाई लढणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतले आहे.